प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटक सिव्हील पोलीस पदासाठी रविवारी लेखी परीक्षा घेण्यात आली. परंतु शनिवारी दुपारपासुन संबंधीत वेबसाईटवरून हॉलतिकिटच डाऊनलोड होत नव्हते. यामुळे रविवारी सकाळपासून हॉलतिकिट मिळवण्यासाठी सायबर कॅफेमध्ये परिक्षार्थींची गर्दी झाली होती. परंतु हॉलतिकिटच डाऊनलोड होत नसल्याने अखेर विद्यार्थ्यांना ऍप्लिकेशन फॉर्म दाखवून परीक्षागृहात प्रवेश घ्यावा लागला.
कर्नाटक राज्य सरकारच्या वतीने एकूण 2007 जागांसाठी सिव्हील पोलीसांची भरती करून घेण्यात येणार आहे. यासाठी लेखी परीक्षा व त्यानंतर शारिरीक चाचणी घेण्यात येणार आहे. रविवारी राज्यभर ही परीक्षा पार पडली. परंतु ksp.gov.in या संकेतस्थळावरून शनिवारी दुपारपासून हॉलतिकिट डाऊनलोड होत नव्हते. हॉलतिकीट डाऊनलोड करण्यासाठी कोणत्याही वेळेचे बंधन नव्हते. तरी देखील तांत्रिक कारणामुळे हॉलतिकिट येत नव्हते.
यामुळे रविवारी सकाळपासूनचा सायबर कॅफेमध्ये विद्यार्थ्यांची झुंबड उडाली होती. हॉलतिकिट नसल्यामुळे परीक्षेला मुकावे लागणार या विचाराने त्यांची घालमेल होत होती. सकाळी 11 वा. लेखी परीक्षेला सुरूवात होणार होती. त्यापुर्वी हॉलतिकिट काढून घेण्यासाठी शहरात गर्दी झाली. परंतु हॉलतिकिटच येत नसल्यामुळे अखेर परिक्षार्थींनी ऍप्लिकेशन फॉर्म दाखवून परीक्षा केंद्रात प्रवेश मिळविला.
परगावच्या विद्यार्थ्यांचे झाले हाल
बेळगाव तालुक्मयाबरोबरच बाहेरच्या तालुक्मयांमधूनही शेकडो विद्यार्थी परीक्षेसाठी शहरात आले होते. शहरातील विविध शाळांमध्ये या परीक्षेचे आयोजन केले होते. हॉलतिकिट मिळत नसल्याने सायबर कॅफेचा शोध घेत परिक्षार्थिंना फिरावे लागत होते. याचबरोबर अनेक विद्यार्थी नवीन असल्यामुळे त्यांना परीक्षा केंद्रही शोधण्यास तारेवरची कसरत करावी लागली.