प्रतिनिधी /धारबांदोडा
धारबांदोडा तालुक्यातील तांबडीसुर्ल येथील प्राचीन महादेव मंदिरात मंगळवारी महाशिवरात्रीनिमित्त राज्यभरातील हजारो भाविकांनी स्वहस्ते अभिषेक व दर्शन घेतले. पहाटेपासून येथील स्वयंभू शिवपिंडीकेवर दुग्धाभिषेक व बेलपत्रे वाहण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे तांबडीसुर्ल येथील महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सव अंत्यंत मर्यादित स्वरुपात साजरा करण्यात आला होता. यंदा कोरोनाचा प्रभाव ओसरल्याने भाविकांची अलोट गर्दी लोटली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी याठिकाणी येऊन अभिषेक केला. दुपारी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. तालुक्यातील इतर शिवमंदिरामध्येही महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला. शिगाव, मोले, मेटवाडा-कुळे याठिकाणी असलेल्या मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.