धास्तावलेल्या इम्रान खानांचा ताजिक अध्यक्षांना फोन
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
अफगाणिस्तानातील तालिबानी राजवट आणि ताजिकिस्तान यांच्यातील तणाव वाढतच चालला आहे. तालिबानने आत्मघाती दहशतवाद्यांना ताजिकिस्तानच्या सीमेवर तैनात केले आहे. ताजिकिस्तान आणि तालिबान यांच्यातील वाढत्या तणावामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान धास्तावले आहेत. तणाव कमी करण्यासाठी त्यांनी ताजिक अध्यक्षांशी संपर्क साधला आहे.
ताजिकिस्तानच्या सुरक्षा दलांनी मागील आठवडय़ात अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या क्षेत्रांमध्ये संचलन केले होते. तर तालिबानने ताजिकिस्तानला लागून असलेल्या सीमेवर हजारो दहशतवाद्यांना पाठविले आहे. ताजिकिस्तानने तालिबान राजवटीबद्दल कठोर भूमिका घेतली आहे. तसेच पंजशीर प्रांतात करण्यात आलेल्या मानवाधिकार उल्लंघनाप्रकरणी टीका केली आहे. तालिबान आणि ताजिकिस्तान यांच्यातील वाद चिघळल्यास रशियाला हस्तक्षेप करावा लागू शकतो. याचीच भीती आता पाकिस्तानला सतावू लागली आहे.
ताजिकिस्तानमध्ये शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेतून परतल्यावर अन्य समुदायांना सामील करून एक सर्वसमावेशक सरकार स्थापन करण्यासाठी तालिबानची समजूत काढू असे म्हटले होते. तसेच त्यांनी त्यावेळी ताजिकिस्तानचे अध्यक्ष इमोमाली यांच्यासोबतच्या चर्चेचा उल्लेख केला होता.
27 टक्के ताजिक वंशीय
ताजिक अफगाणिस्तानातील दुसरा सर्वात मोठा वांशिक समुदाय आहे. ताजिक वंशीयांचे अफगाणिस्तानच्या लोकसंख्येतील प्रमाण सुमारे 27 टक्के इतके आहे. याचदरम्यान तालिबानला विरोध करणाऱया बहुतांश गटांनी ताजिकिस्तानात आश्रय घेतला आहे. तर तालिबानने आत्मघाती दहशतवाद्यांची धोकादायक बटालियन निर्माण केली असून ती ताजिकिस्तान आणि चीनच्या सीमेवर तैनात करण्यात आली आहे. या हल्लेखोरांना बदख्शान प्रांतात तैनात केले जाणार आहे.