ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईमधील पंचतारांकित ‘ताज’ हॉटेलच्या सहा कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू असून, या कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग कोणामुळे झाला याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
काही दिवसांपूर्वीच टाटा समूहाने कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी ताज हॉटेलचे दरवाजे खुले केले होते. त्यानुसार डॉक्टरांच्या राहण्याची सोय या हॉटेलमध्ये करण्यात आली होती. ताज हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या 8 आरोग्य सेवकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. हे आरोग्य कर्मचारी दिवस-रात्र कोरोना बाधित रुग्णसेवा करत आहेत. त्यातूनच हॉटेलमधील 6 कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.