कराडमधून अल्पवयीन मुलाने केलेल्या फोनमुळे खळबळ, पोलीस चौकशीत गमतीने फोन केल्याचे निष्पन्न
वार्ताहर /कराड
मुंबईतील ताज हॉटेलवरील 26/11 च्या अतिरेकी हल्ल्याच्या आठवणीने आजही अंगावर शहारे येतात. या परिस्थितीत शनिवारी पुन्हा ताज हॉटेलच्या रिसेप्शन काऊंटरचा फोन खणाणला आणि ताज हॉटेलच्या पाठीमागच्या गेटमधून दोन अतिरेकी एके 47 रायफल घेऊन घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना रोखा असे सांगण्यात आले. याबाबत कुलाबा पोलिसांनी फोनचे लोकेशन तपासले असता तो फोन कराडमधून आल्याचे स्पष्ट झाले. यावरून कराड शहर पोलिसांनी तपास केला असता तो फोन एका अल्पवयीन मुलाने गंमत म्हणून केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.
याबाबत कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बी. आर. पाटील यांनी सांगितले की, कराडमधील एका नववीत शिकणाऱया 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने मुंबई येथील हॉटल ताजमधील रिसेप्शन काउंटरला फोन केला. हॉटेलमध्ये फोन उचलल्यानंतर संबंधित अल्पवयीन मुलाने ताजमहाल हॉटेलच्या पाठीमागील गेटमधून दोन अतिरेकी एके 47 रायफल घेऊन घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना रोखा व बंदोबस्त वाढवावा, असे सांगितले. कुलाबा पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आलेल्या फोनचे लोकेशन तपासले असता तो फोन कराडहुन आल्याचे समजले.
कुलाबा पोलिसांनी याबाबतची माहिती त्वरित कराड पोलिसांना सांगितली. कराड शहर पोलिसांनी ज्या नंबरवरून फोन करण्यात आला, त्या नंबरवरून संबंधित व्यक्तीकडे चौकशी केली असता तो फोन नंबर मुलगा वापरत असल्याचे संबंधितांनी सांगितली. मुलगा इयत्ता नववीमध्ये शिकत असून 14 वर्षाचा आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी नातेवाईकांसमोरच संबंधित मुलाकडे चौकशी केली असता त्याने गंमत म्हणून फोन केल्याचे सांगितले. तसेच शुटाऊट वडाळा, 26/11 यासारखे चित्रपट बघितल्याने त्याचा प्रभाव असल्याचेही सांगितले. दरम्यान, प्रथमदर्शनी केलेल्या चौकशीमध्ये संबंधित अल्पवयीन मुलाचा समाज विघातक घटनांशी कुठलाही संबंध असल्याचे दिसून येत नाही. संबंधित मुलाने गंमत म्हणून हा फोन केल्याचे दिसून येत आहे. तरीही याची सखोल चौकशी करून काही आक्षेपार्ह आढळल्यास योग्य ती कारवाई करणार असल्याचेही वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी सांगितले. हे वृत्त सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली होती.