कुपवाड / प्रतिनिधी
मिरज तालुक्यातील तानंग व बामणोली या दोन्ही गावात खुलेआम चालणार्या मटका अड्ड्यावर सांगली व कुपवाड पोलिसांनी शनिवारी दुपारी छापा टाकला. या कारवाईत मटका घेणाऱ्या दोघा एजंटांना अटक करून गुन्हा दाखल करत त्यांच्याकडून रोख रकमेसह मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यामध्ये संशयित बाळू दादू मोरे ( वय ३८,रा.तानंग) व अकबर अब्दुल अत्तार ( वय५२, रा.शिवाजीनगर, बामणोली) अशी अटक केलेल्या मटका एजंटची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तानंग येथील एका प्रार्थना स्थळाजवळच्या एका घरात एकजण मटका घेत असल्याची माहिती सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता संशयित बाळू मोरे (रा.तानंग) हा मटका घेत असताना रंगेहाथ सापडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याजवळील रोख रक्कम व मटका साहित्य असा ६१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर बामणोली येथे शिवाजीनगर चौकाजवळच्या एका घरात एकजण मटका घेत असल्याची माहिती कुपवाड पोलिसांना मिळाली. पोलिसांनी छापा टाकला असता संशयित अकबर अत्तार (रा.बामणोली) हा मटका घेत असताना रंगेहाथ सापडला.पोलिसांनी त्याला ताब्यात घेवुन त्याच्या जवळील रोख रक्कम व साहित्य असा ५३२ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.