प्रतिनिधी/ बेळगाव
रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाचे काम सुरू असल्यामुळे शनिवारी सकाळी अजमेर-म्हैसूर रेल्वे तानाजी गल्ली रेल्वेगेट येथे काहीकाळ थांबविण्यात आली. बराचवेळ रेल्वेगेट बंद राहिल्याने तानाजी गल्ली परिसरात दोन्ही बाजूंनी वाहतुकीची प्रचंड गर्दी झाली होती. दुचाकी, चारचाकी वाहने अडकून पडल्यामुळे वाहन चालकांतून संताप व्यक्त होत होता. जेसीबी बाजूला करून रेल्वे मार्गस्थ झाल्यानंतर रेल्वेगेट खुले करण्यात आले. त्यामुळे वाहनचालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
तानाजी गल्ली रेल्वेगेटपासून ते रेल्वेस्थानकापर्यंतच्या रेल्वेमार्ग दुपदरीकरणाचे काम सुरू आहे. शनिवारी जेसीबीने या ठिकाणी काम करण्यात येत होते. बाजूची माती काढणे यासह इतर कामे करण्यात येत होती. काम सुरू असल्यामुळे अजमेरवरून म्हैसूरला जाणारी एक्स्प्रेस तानाजी रेल्वेगेटनजीक थांबविण्यात आली. स्थानकात जाणारी रेल्वे अचानक रेल्वेगेटनजीक थांबविण्यात आल्याने बघ्यांची गर्दी झाली. रेल्वे मध्येच थांबल्याने प्रवाशांचीही घालमेल झाली.
रेल्वे येण्यापूर्वी बंद करण्यात आलेले रेल्वेगेट बराचवेळ बंदच होते. यामुळे तानाजी गल्ली रेल्वेगेटपासून महाद्वार रोडपर्यंत तर दुसऱया बाजूला फुलबाग गल्लीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे वाहतूक कोंडीत अडकलेले वाहनचालक त्रस्त झाले होते. 10 ते 15 मिनिटांनंतर काम थांबवून रेल्वे मार्गस्थ झाली. त्यानंतर रेल्वेगेट खुले करण्यात आले.