वार्ताहर / कास :
महाबळेश्वर तालुक्यातील कुरोशी गावच्या हद्दीतील सोळशी नदीवरील जुना पूल वाहून गेल्याने तापोळा भाग व कुरोशीच्या अलिकडील बामणोली भागाचा संपर्क तुटला आहे. बामणोली डोंगर रांगाकडील कुरोशी, सौंदरी, देवसरे, आचली, येरणे, लाखवड, गोगवे, वारसोळी, रामेघर, वाकी ह्या गावातील लोकांना रस्ते मार्गाने तापोळा विभागातील सोनाट, खांबील, वेंगळे, वाघेरा, तापोळा ह्या गावांकडे जाता येणार नाही.
कुरोशी गावालगत सोळशी नदीवर हा पूल सुमारे साठ वर्षांपूर्वी बांधला होता. जुन्या दगडी बांधकाम असलेल्या ह्या पूलाचा अर्धा भाग काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसाने आलेल्या पूरात वाहून गेला आहे. त्यामुळे बामणोली भागाकडच्या कुरोशी गावापर्यंतच्या अनेक गावांचा रस्ते मार्गाने तापोळा भागाशी होणारा संपर्क तुटला आहे. दोन्ही विभागातील लोकांना अलिकडे व पलिकडे जाण्यासाठी हा एकमेव पूल होता. तो वाहिल्याने दोन्ही विभागांचा संपर्क तुटला आहे.
कुरोशी भागातील लोकांना बाजारपेठ असलेल्या तापोळा गावात जाण्यासाठी आता बोटीशिवाय पर्याय उरला नाही. पण सद्यस्थितीत नदीच्या पाण्याचा प्रवाह एवढा मोठा आहे, की बोटीतून प्रवास करणे शक्य नाही. चुकून असा प्रवास केल्यास दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही.