ऑनलाईन टीम / चेन्नई :
तामिळनाडूचे कृषीमंत्री आणि अण्णाद्रुमुक पक्षाचे ज्येष्ठ नेते आर. दोराईकन्नू यांचे करोनाने निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. चेन्नईतील कावेरी रुग्णालयात शनिवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दोराईकन्नू यांचा 13 ऑक्टोरला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना चेन्नईतील कावेरी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. दोराईकन्नू यांच्या सीटी स्कॅनमध्ये 90 टक्के फुफ्फुसाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले होते. त्यांना ईसीएमओ आणि व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
दोराईकन्नू थंजावुर नार्थ जिल्ह्यातील एआयएडीएमकेचे सचिव होते. 2006, 2011 आणि 2016 च्या निवडणुकीत दोराईकन्नू तामिळनाडूतील पापानासम विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी 2011 मध्ये प्रथमच राज्याच्या कृषिमंत्रीपदी त्यांची नियुक्ती केली होती. तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी मंत्र्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एडापड्डी के. पलानीस्वामी यांनी काल संध्याकाळी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती.