चेन्नई / वृत्तसंस्था
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत तामिळनाडूतील मोठमोठय़ा सराफ व्यावसायिक आणि शेअर बाजार गुंतवणूकदारांवर रविवारी छापे टाकण्यात आले. चेन्नई शहरासह विविध ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत एक हजार कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. दक्षिण भारतातील सर्वात मोठय़ा सराफ व्यावसायिकाचा यामध्ये समावेश असल्याची चर्चा असली तरी संबंधितांची नावे उघड करण्यात आलेली नाहीत.
गेल्या दोन-चार दिवसांपासून तामिळनाडूतील व्यावसायिकांच्या एकूण 27 मालमत्तांवर छापे टाकण्यात आले आहेत. तसेच मुंबई, मदुराई, तिरुचिरापल्ली, थ्रिसूर, जयपूर, इंदोर, नेल्लोरे इत्यादी ठिकाणच्या मालमत्तांचाही समावेश होता. या छाप्यात 1 कोटी 20 लाखांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. या सराफांनी बनावट बिले सादर करून बोगस हिशेब दाखवल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. या छाप्यांमध्ये सीबीडीटीचे अधिकारीही सहभागी झाले होते.
‘काळे’ कारनामे उघड
येथील व्यावसायिकांनी मोठय़ा प्रमाणात रोकड जमा करून त्यांचा वापर इतर व्यवसायांसाठी केल्याचे उघड झाले आहे. तसेच करचुकवेगिरीचाही पर्दाफाश झाला आहे. मोठमोठय़ा व्यावसायिकांनी रोख रक्कम बिल्डर किंवा बांधकाम व्यवसायातील साथीदारांना दिल्याचेही उघडकीस आले आहे. काही रक्कम कर्ज स्वरुपात देण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी कोणतीही अधिकृत कागदपत्रे नसल्यामुळे बोगसगिरी उघड झाली आहे. अनेक बनावट बिले आणि पावत्याही छाप्यादरम्यान ‘सीबीडीटी’च्या अधिकाऱयांनी हस्तगत केल्या आहेत.