वृत्तसंस्था/ अहमदाबाद
सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 लीग क्रिकेट स्पर्धेत रविवारी येथील मोटेरा स्टेडियमवर बलाढय़ तामिळनाडू आणि बडोदा या दोन संघामध्ये जेतेपदासाठी चुरशीची लढत होणार आहे. या सामन्याला रविवारी सायंकाळी 7 वाजता प्रारंभ होईल.
तामिळनाडूचा संघ युवा आणि अनुभवी खेळाडूंच्या सहभागात समतोल असून या संघाने सदर स्पर्धेत आपल्या कामगिरीत सातत्य राखत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे. या स्पर्धेच्या प्राथमिक गटातील काही सामन्यामध्ये तामिळनाडूला प्रतिस्पर्धी संघाचे आव्हान स्वीकारताना विजयासाठी झगडावे लागले होते. पण दुसऱयांदा फलंदाजी करत तामिळनाडूने विजय नोंदविले आहेत.
केदार देवधरच्या नेतृत्वाखालील बडोदा संघाने साखळी फेरीतील आपले सामने एकतर्फी जिंकले आहेत. पण हरियाणा विरूद्ध उपांत्यपूर्व सामन्यात बडोदा संघाला विजयासाठी झगडावे लागले होते. या सामन्यात बडोदा संघातील विष्णु सोळंकीने शेवटच्या चेंडूवर हॅलिकॉप्टर फटक्यावर षटकार खेचत आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. बडोदा संघातील महत्त्वाचा फलंदाज दीपक हुडाचे कर्णधार कृणाल पंडय़ासमवेत तीव्र मतभेद झाले होते. या घटनेमुळे दीपक हुडाला संघातील स्थान गमवावे लागले. तसेच वडिलाच्या निधनामुळे कृणाल पांडय़ाने या स्पर्धेतून माघार घेतल्याने त्याच्या जागी केदार देवधरची हंगामी कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली.
हिमाचलप्रदेशविरूद्ध उपांत्यपूर्व सामन्यात तामिळनाडूलाही विजयासाठी कसरत करावी लागली. शाहरूख खानची फटकेबाजी तसेच बाबा अपराजितच्या समयोचित खेळीने तामिळनाडूने विजय मिळविला होता. राजस्थानविरूद्ध उपांत्य सामन्यात तामिळनाडू संघातील ज्येष्ठ के.बी. अरूण कार्तिकने केलेल्या 89 धावांच्या खेळीच्या जोरावर तामिळनाडूने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.
तामिळनाडू संघाचा सलामीचा फलंदाज जगदेशनने फलंदाजीत सातत्य राखताना या स्पर्धेत आतापर्यंत सवाधिक म्हणजे 350 धावा जमविल्या आहेत. सी. हरी निशांत आणि कर्णधार दिनेश कार्तिक यांची फलंदाजी समाधानकारक होत आहे. रविवारच्या अंतिम सामन्यात शाहरूख खान मोठी खेळी करून आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल तसेच पुढील महिन्यात होणाऱया आयपीएल स्पर्धेसाठीच्या खेळाडूंच्या लिलावाकरिता प्रँचायजीचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करेल. तामिळनाडू संघातील डावखुरा फिरकी गोलंदाज साई किशोरने आतापर्यंत या स्पर्धेत 8 गडी बाद केले आहेत. साई किशोर, एम. अश्विन, अपराजीत, मोहम्मद, सोनू यादव हे तामिळनाडू संघातील प्रमुख गोलंदाज आहेत.
बडोदाचा संघ आता जलद क्रिकेट प्रकारात तिसऱयांदा राष्ट्रीय विजेतेपद मिळविण्यासाठी आतुरलेला आहे. कर्णधार केदार देवधर यांनी या स्पर्धेत आतापर्यंत 333 धावा जमविल्या आहेत. बडोदा संघाच्या फलंदाजीची भिस्त प्रामुखाने देवधर, सोळंकी यांच्यावर राहील. कार्तिक काकडेला पुन्हा सूर मिळाल्याने बडोदा संघाची मधलीफळी भक्कम होवू शकेल.
बी. पठाण हा बडोदा संघातील उपयुक्त अष्टपैलू आहे. अतित सेठ आणि मेरीवाला हे बडोदा संघातील वेगवान गोलंदाज आहेत. भार्गव भट्ट, निनांत रातवा आणि कार्तिक काकडे हे बडोदा संघातील फिरकी गोलंदाज आहेत. तामिळनाडूची भक्कम फलंदाजी आणि बडोदा संघाची अचूक गोलंदाजी यांच्यातील चुरस रविवारच्या अंतिम सामन्यात पाहावयास मिळेल.