वृत्तसंस्था/ बेंगळूर
आठव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत प्ले ऑफ गटात स्थान मिळविण्यासाठी बुधवारी येथे तामिळ थलैवाज आणि युपी योद्धा यांच्यात महत्त्वाचा सामना खेळविला जाणार आहे. या स्पर्धेत वरील दोन्ही संघ आघाडीच्या पहिल्या सहा संघांच्या क्रमवारीतून बाहेर असल्याने बुधवारच्या सामन्यात विजयासाठी त्यांच्यात चुरशीची लढत अपेक्षित आहे.
युपी योद्धाची भिस्त प्रामुख्याने सुमीत-नितेशकुमार यांच्यावर राहील. सुमीत आणि नितेशकुमार यांना तामिळ संघाच्या आक्रमक चढाया रोखाव्या लागतील तर तामिळ संघाची भिस्त प्रामुख्याने बचावफळीतील सुरजित सिंग-सागर यांच्या कामगिरीवर अवलंबून राहील. या स्पर्धेतील यापूर्वी झालेल्या परतीच्या सामन्यात तामिळ संघाने युपी योद्धाचा पराभव केला होता. त्या सामन्यात सागरने पाच महत्त्वाचे गुण मिळविले होते.
युपी संघाच्या बचावफळीत श्रीकांत जाधवला सुरिंदर गिलकडून सहकार्य आवश्यक आहे. आठव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत सोमवारी शतकी (100 वा) सामना खेळविला गेला. बुधवारी या स्पर्धेत तेलगू टायटन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात दुसरा सामना खेळविला जाईल. गुजरात संघाने यापूर्वी दोनवेळा या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली आहे. तेलगू टायटन्सने या स्पर्धेत 17 सामन्यांतून 26 गुण मिळविले असून त्यांचे प्ले ऑफ गटात स्थान मिळविण्याचे आव्हान यापूर्वी संपुष्टात आले आहे.