राहुल तारी यांच्या निवडीने सर्वत्र कौतुक : 1 लाख 20 हजारांची मिळणार अभ्यासवृत्ती
मनोज चव्हाण / मालवण:
तालुक्यातील तारकर्ली गावचा सुपुत्र राहुल रविकांत तारी याची महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फे दिल्या जाणाऱया रंगसेतु अभ्यासवृत्तीसाठी दृष्यकला विभागात 2020-21 या वर्षासाठी निवड झाली आहे.
पूर्ण महाराष्ट्रातून अर्ज मागवून, त्यांचे परीक्षण करून प्रत्येक कलाक्षेत्रातील 5 व्यक्तींची निवड करून त्यांना मुलाखतीसाठी पाचारण केले जाते. चार तज्ञ समन्वयक दोन दिवसांच्या कार्यशाळेसह मुलाखती घेऊन प्रत्येक कलाक्षेत्रातील एक, अशा एकूण चार कलाकारांची अंतिम निवड ‘रंगसेतु’ अभ्यासवृत्तीसाठी करतात. नाटय़ (लेखन, दिग्दर्शन, अभिनय), दृश्यकला (चित्र, शिल्प, इंस्टॉलेशन अन्य), संगीत (गायन, वादन, संगीत रचना), नृत्य (सर्व भारतीय अभिजात नृत्यशैली, आधुनिक व प्रायोगिक नृत्य प्रकार) या प्रकारांत कार्यरत असलेल्या, महाराष्ट्रातील उद्ययोन्मुख कलाकारांना या अभ्यासवृत्तीसाठी अर्ज करता येतो.
रंगसेतुबद्दल थोडेसे….
रंगसेतु अभ्यासवृत्तीबद्दल बोलताना तारी म्हणतो, महाराष्ट्र कल्चरल सेंटर ही प्रयोगकलांच्या क्षेत्रात कार्यरत असलेली पुण्यातील एक अग्रगण्य व मान्यवर संस्था आहे. संस्थेने ‘रंगसेतु अभ्यासवृत्ती’ हा एक महत्वपूर्ण प्रकल्प 2018 पासून सुरू केला आहे. नाटय़, दृश्यकला, संगीत व नृत्य या कलाक्षेत्रांत व्यावसायिक म्हणून जम बसवू पाहणाऱया महाराष्ट्रातील तरुण कलाकारांसाठी महाराष्ट्र कल्चरल सेंटर या संस्थेने जाहीर केलेली ही एक वर्षाची विशेष अभ्यासवृत्ती आहे. ‘रंग’ ही संकल्पना भरतमुनींच्या नाटय़शास्त्रापासून प्रयोगकलांच्या संदर्भात वापरली गेली आहे तसेच दृश्यकलांतही ‘रंग’ हा घटक किती महत्वाचा आहे हे आपण जाणतोच. ‘सेतु’ म्हणजे दोन तीर जोडणारा. पूर्वानुभव किंवा कलाशिक्षण, सृजनात्मक काम आणि प्रत्यक्ष व्यवसाय यांचा दुवा सांधणारी ही अभ्यासवृत्ती आहे, म्हणून हिचे नाव ‘रंगसेतु.’
निवडलेल्या विद्यार्थ्याला मिळते अभ्यासवृत्ती
निवड झालेल्या कलाकाराला दरमहा दहा हजार रुपये (पूर्ण वर्षात एक लाख वीस हजार रुपये) अशी अभ्यासवृत्ती दिली जाते. दर तीन महिन्यांनी कलाकाराने आपण केलेल्या सृजनात्मक कामाचा वृत्तांत / आढावा पाठविणे आवश्यक आहे. तज्ञांच्या समितीने या वृत्तांतास मान्यता दिल्यानंतर अभ्यासवृत्तीचा पुढील हप्ता देण्यात येतो. अशाप्रकारे एकूण चार हप्त्यांमध्ये ही अभ्यासवृत्ती दिली जाते. अभ्यासवृत्तीच्या अखेरीस सर्व कलाकारांनी या कालावधीत केलेल्या सृजनात्मक कामावर आधारित विशेष प्रस्तुती (नाटय़ाविष्कार, प्रदर्शन, संगीत / नृत्य मैफिल, व्हीडिओ/ ऑडिओ प्रॉडक्शन इत्यादी प्रकारे) महाराष्ट्र कल्चरल सेंटरमध्ये करणे बंधनकारक आहे. राहुल तारी याची या अभ्यासवृत्तीसाठी निवड झाल्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तारकर्लीचे माजी सरपंच रविकांत तारी यांचा राहुल मुलगा होय.