प्रतिनिधी/ सातारा
जिल्हय़ातील एक युवक त्याच्या पत्नीला आणण्यासाठी तारळे, ता. पाटण येथे गेला होता. यावेळी तिथे वाद झाला. या वादानंतर त्याच्या पत्नीसह तिचा भाऊ, बहिणीने त्याला मारहाण केली. पत्नीने त्याच्यावर चाकूचा वार केल्याने तो जखमी झाल्याची घटना घडली आहे. हरचंद्र प्रकाश कांबळे (वय 30, रा. कोरेगाव, ता. शिरूर, जि. पुणे) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.
हरिचंद्र कांबळे हा शिरुर तालुक्यातील कोरेगावाचा रहिवासी आहे. मंगळवार दि. 8 रोजी तो पुण्याहून तारळे, ता. पाटण येथील त्याच्या सासरवाडीत गेला होता. त्यावेळी त्याने पत्नी साधना कांबळे हिला त्याच्याबरोबर येण्यास सांगितले असता त्या ठिकाणी वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणमारीत झाल्यावर यावेळी वैभव कांबळे, दीपा कांबळे आणि पत्नी साधना कांबळे यांनी हरिचंद्र कांबळे याला मारहाण केली. पत्नी साधना कांबळे हिने त्याच्या पोटात चाकू मारल्याने तो जखमी झाला.
या घटनेनंतर जखमी अवस्थेत हरिचंद्र कांबळे याच्यावर प्रथम नागठाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती रुग्णालयीन पोलीस कक्षातून देण्यात आली.