बंद घराचा पाठीमागील दरवाजा फोडून रोकड, दागिने पळविले
प्रतिनिधी/ बेळगाव
तारिहाळ (ता. बेळगाव) येथे एका बंद घराचा पाठीमागील दरवाजा फोडून चोरटय़ांनी 12 लाख रुपयांचा ऐवज पळविला आहे. शनिवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला असून या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
तारिहाळ येथील पांडू कल्लाप्पा खणगावकर यांच्या घरी चोरीचा प्रकार घडला आहे. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस येताच हिरेबागेवाडी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चोरटय़ांचा माग काढण्यासाठी श्वान पथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले.
उपलब्ध माहितीनुसार चोरटय़ांनी पांडू यांच्या घराचा पाठीमागील दरवाजा फोडून घरात प्रवेश केला. तिजोरीतील 4 लाख रुपये रोख रक्कम व 11 तोळे सोन्याचे दागिने पळविले आहेत. यापैकी 2 लाख रुपये पांडू यांचे स्वतःचे तर 2 लाख रुपये अय्यप्पा स्वामी मंदिरासाठी जमविलेले होते. मंदिराचे तीन तोळय़ाचे दागिने व पांडू कुटुंबीयांचे आठ तोळय़ांचे दागिने चोरटय़ांनी पळविले आहेत.
बुधवार दि. 8 डिसेंबर रोजी पांडू यांची पत्नी व मुले नातेवाईकांच्या लग्नसमारंभात भाग घेण्यासाठी सुळेभावीला गेले होते. पांडू यांनी सध्या अय्यप्पा स्वामी माला धारण केली आहे. त्यामुळे ते घराजवळच असलेल्या मंदिरात झोपतात. नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री ते मंदिरात झोपले होते. शनिवारी सकाळी त्यांचे कुटुंबीय गावाहून परतले, त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला.
चोरटय़ांनी दरवाजाचा कडीकोयंडा फोडला आहे. सुमारे 12 लाख रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज पळविल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. केवळ पांडू यांचे स्वतःचेच नव्हे तर मंदिरासंबंधीची रक्कम व दागिनेही पळविले आहेत. हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर पुढील तपास करीत आहेत.