ऑनलाईन टीम / काबुल :
तालिबानकडून अफगाणिस्तानमध्ये सर्वसमावेशक असे काळजीवाहू सरकार स्थापन करण्याच्या हलचाली सुरू झाल्या आहेत. तालिबानच्या सल्लागार समितीच्या सदस्याने तेथील स्थानिक मीडियाला यासंदर्भात माहिती दिली आहे.
तालिबान शुरा अर्थात सल्लागार समिती काळजीवाहू सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. तालिबानचा सहसंस्थापक मुल्लाह अब्दुल घनी बरादर सध्या काबूलमध्ये आहे. तर तालिबानी सैन्याचा प्रमुख मुल्लाह महंमद याकूब कंदहारमध्ये असून, तो काळजीवाहू सरकारच्या निर्मितीसाठी तो काबूलकडे निघाला आहे. तालिबान्यांच्या काळजीवाहू सरकारमध्ये अफगाणिस्तानातील सर्व वंशाचे आणि आदिवासी प्रांतात वास्तव्यास असलेल्या 12 जणांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. तसेच तालिबानी कमांडर आणि नेत्यांचाही यात समावेश असणार आहे. देशाच्या मंत्रिमंडळाप्रमाणेच सर्व खात्यांचे मंत्री तालिबानच्या या काळजीवाहू सरकारमध्ये असतील, असे ‘द न्यूज इंटरनॅशनल’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.