टीटीपी दहशतवाद्यांप्रकरणी अंग झटकले
पाकिस्तानी सैन्याच्या मदतीने सत्तेवर आलेल्या तालिबानी दहशतवाद्यांनी जनरल कमर बाजवा यांना मोठा झटका दिला आहे. पाकिस्तानी सैन्यासाठी डोकेदुखी ठरलेल्या तहरीक-ए-तालिबानकरता कुठलीच समिती स्थापन केलेली नसल्याचे तालिबानने म्हटले आहे. तर पाकिस्तानने तालिबानला टीटीपीच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांची यादी सोपविल्याचे सांगितले होते. तसेच तालिबान प्रमुख हैबतुल्ला अखूंदजादाने टीटीपीकरता एक समिती स्थापन केल्याचा दावा केला होता.
अफगाणिस्तानने टीटीपीच्या विरोधात कुठलीच समिती स्थापन केलेली नाही. अफगाणिस्तानच्या भूमीवरून कुठल्याच देशाविरोधात दहशतवाद फैलावू दिला जाणार नसल्याचे आश्वासन पूर्वीच देण्यात आल्याचे तालिबानचे प्रवक्ते सुहैल शाहीन यांनी सांगितले आहे.
अफगाणिस्तानच्या तुरुंगातून टीटीपी नेता फकीर मोहम्मदची सुटका करण्यात आली आहे. लोक पळाले असून याकरता अशरफ गनी सरकार जबाबदार आहे. गनी सरकार अचानकपणे पळून गेल्याने कैदी फरार झाल्याचा दावा शाहीन यांनी केला.
तर तालिबानने एकप्रकारे आता टीटीपीप्रकरणी अंग झटकले आहेत. यापूर्वी पाकिस्तानी सैन्यप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी तालिबानवर नियंत्रण मिळविण्यासाठी जगभरातून वाढत्या दबावादरम्यान तालिबानला कठोर संदेश दिला होता. तालिबानने महिला आणि मानवाधिकांवरून जागतिक समुदायाला दिलेली आश्वासने पूर्ण करावीत. तसेच स्वतःच्या भूमीचा इतरांच्या विरोधात वापर करू देऊ नये असे बाजवा यांनी बजावले होते.