ऑनलाईन टीम / काबुल :
अफगाणिस्तानातील तालिबानी सरकारने आपल्या विशेष लष्करी तुकडीला पानिपत असे नाव दिले आहे. 1761 साली अहमद शाह दुर्राणीच्या नेतृत्वाखाली झालेल्या पानिपतच्या लढाईत अफगाणी फौजांकडून मराठय़ांचा पराभव झाला होता. त्यामुळे भारताला डिवचण्याच्या हेतूने तालिबानने लष्करी तुकडीला पानिपत नाव दिले असून, यातून त्यांची भारतविरोधी मानसिकता समोर आली आहे.
अफगाणिस्तानच्या अमेज न्यूजने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘पानिपत ऑपरेशनल युनिट’ देशाच्या पूर्वेकडील नांगरहार प्रांतात तैनात केले जाईल. हा प्रांत पाकिस्तानच्या सीमेला लागून आहे. ट्विटमध्ये एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या छायाचित्रात लष्कराच्या या नव्या तुकडीचे सैनिक मास्क घातलेले आणि गणवेशात दिसत आहेत. सैनिकांच्या हातात अमेरिकन रायफल आहे. हे चित्र राजधानी जलालाबादमधील सैनिकांच्या परेडचे असल्याचे सांगण्यात येत आहे.
पानिपतच्या लढाईचा संदर्भ अनेकदा अफगाणिस्तानमधील ग्रामीण भागांमध्ये दिला जातो. येथील मुस्लिमांच्या भावना भडकवण्यासाठी आणि त्यांना शस्त्र हाती घेण्यासाठी प्रेरित करायला पानिपतच्या युद्धामधील गोष्टी सांगितल्या जातात.