अमेरिकेच्या अभ्यासकांचे मत, तालिबान-पाक युतीसंबंधी जगभरात चिंता
वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
तालिबानला अफगाणिस्तानचा ताबा मिळवून देण्यासाठी पाकिस्तानच कारणीभूत आहे, असे मत अमेरिकेतील अनेक अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे भविष्यात अफगाणिस्तानप्रमाणे अमेरिकेला पाकिस्तानवरही बारकाईने लक्ष ठेवावे लागणार आहे. तालिबान-पाकिस्तान यांची युती पुढे कोणती दिशा घेईल यावर जगाची शांतता अवलंबून असेल असे प्रतिपादन अनेक अमेरिकन तज्ञांचे आहे.
अफगाणिस्तानवर नियंत्रण असणे पाकिस्तानसाठी महत्वाचे आहे. हे नियंत्रण तालिबानच्या माध्यमातून मिळविण्याचा प्रयत्न पाक गेली 25 वर्षे करीत आहे. अमेरिकेने आपली सेना अफगाणिस्तानात 2001 मध्ये धाडल्यानंतर पाकच्या प्रयत्नांना खीळ बसली होती. अमेरिकेने अफगाणिस्तानात सुधारणा घडविण्याचा बराच प्रयत्न केला. त्यात अमेरिकेला यशही आले. पण तालिबानला पूर्णतः नेस्तनाबूत करणे जमले नाही. अखेर 20 वर्षांनंतर तेथून अमेरिका माघारी गेली.
पाकिस्तानच कारणीभूत
पाकिस्तानने गेल्या 10 वर्षांपासून तालिबानला विश्वासात घेण्याचा प्रयत्न चालविला होता. तालिबानला शस्त्रे आणि प्रशिक्षण देण्याचे काम पाकिस्तानने केले. तसेच तालिबानमध्ये आपल्या समर्थकांचा वर्ग निर्माण केला. विशेषतः गेल्या तीन महिन्यांमध्ये पाकिस्तानने तालिबानला लष्करी साहाय्य मोठय़ा प्रमाणात पुरविले. त्यामुळे अफगाणिस्तानचा ताबा घेणे तालिबानला शक्य झाले.
पाक दहशतवाद्यांचा प्रवेश
पाकिस्तानातील अनेक दहशतवादी संघटनांच्या हजारो हस्तकांनी आता अफगाणिस्तानमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी स्थानिकांना त्रास दिल्याच्या आणि लूटमार केल्याच्या घटना घडल्या आहेत. तालिबानची सत्ता अफगाणिस्तानवर असली तरी नियंत्रण आपल्या हाती राहील अशी व्यवस्था पाकिस्तानला करायची आहे, असे अमेरिकेच्या तज्ञांना दिसून आले आहे. त्यामुळे अमेरिकेवरची जबाबदारी वाढणार असून तालिबान-पाकिस्तान युती धोकादायक वळण घेऊ नये याची दक्षता विश्वसमुदायाला घ्यावी लागणार आहे, यावर तज्ञांचे एकमत आहे.
हक्कानी नेटवर्कचे महत्व
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात कार्यरत असणाऱया हक्कानी दहशतवादी नेटवर्कवर अमेरिकेचे विशेष लक्ष आहे. या नेटवर्कला उध्वस्त करण्यासाठी पाकिस्तानने गंभीरपणे प्रयत्न केले नाहीत, म्हणून अमेरिकेने पाकचे साहाय्य कमी केले होते. आता अफगाणिस्तानातील नव्या स्थितीत हक्कानी म्होरक्यांचे महत्व वाढले आहे. सत्तेत महत्वाची पदे मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
तालिबान काय करणार
तालिबानला पाकिस्तानने मोठे साहाय्य केले आहे यात संशय नाही. तथापि, आता अफगाणिस्तानची सत्ता हाती आल्यानंतर तालिबान पाकिस्तानच्या ताटाखालचे मांजर बनून राहील काय, यासंबंधीही शंका उपस्थित केल्या जात आहेत. एकेकाळी तालिबानला अमेरिकेनेही प्रचंड साहाय्य केले होते. तालिबानचे अस्तित्वच या साहाय्यावर अवलंबून होते. तथापि, नंतर तालिबानने अमेरिकेलाच आपला शत्रू मानण्यास कमी केले नाही. असा इतिहास असणारा तालिबान पाकिस्तानच्या उपकाराखाली तरी किती दिवस राहील असाही प्रश्न आहे. एकंदर सध्याची या दोन्ही देशांमधील स्थिती दोलायमान असून येत्या काही महिन्यांमध्ये चित्र अधिक स्पष्ट होऊ शकते, असे मतप्रदर्शन तज्ञांनी केले आहे.