गुवाहाटी / वृत्तसंस्था
सोशल मीडियात तालिबानचे समर्थन करणारा मजकूर टाकल्याबद्दल आसाम पोलिसांनी 14 जणांना अटक केली आहे. शुक्रवारी रात्रीपासून आसामच्या विविध भागातून या लोकांवर ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याविरोधात आयटी कायदा, सीआरपीसी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर तालिबानचे समर्थन करणाऱ्या पोस्ट कोणीही व्हायरल केल्यास त्यासंबंधी पोलिसांना माहिती देण्याची सूचना पोलीस दलाने राज्यातील जनतेला केली आहे. अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता हस्तगत केल्यानंतर काही जणांनी उन्माद आल्यासारख्या पोस्ट टाकल्या आहेत. अशा व्हायरल पोस्टमधील आसाममधील वातावरण बिघडू नये यासाठी दक्षता घेतली जात असल्याचे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.