ऑनलाईन टीम / काबुल :
तालिबानला सत्ता स्थापनेसाठी छुपी मदत करणाऱ्या पाकिस्तानने आता पंजशीर युद्धात थेट उडी घेत पंजशीरवर बॉम्ब हल्ला केला आहे. आजवर अजिंक्य ठरलेला पंजशीर प्रांत लवकरात लवकर तालिबानच्या हाती यावा, यासाठी पाकच्या हवाई दलाने ड्रोनच्या सहाय्याने हा बॉम्ब हल्ला करुन तालिबानला मदत केली आहे. अफगाणिस्तानचे सामंगन प्रांताचे माजी खासदार जिया अरियनजादो यांनी याची माहिती दिली आहे.
पंजशीरमध्ये तालिबानी दहशतवादी आणि विरोधी गट रेझिस्टंस फ्रंट यांच्यात जोरदार युद्ध सुरू आहे. पंजशीरमधील योद्धयांचे खच्चीकरण करण्याचा पाकिस्तानचा डाव आहे. त्यामुळे रविवारी रात्री पाकच्या हवाई दलाने ड्रोनच्या माध्यमातून पंजशीरवर बॉम्ब हल्ला केला. यात तालिबानला प्रतिकार करणाऱ्या रेझिस्टन्सफ्रंटचे प्रवक्ते फहीम दाश्ती, जनरल साहिब अब्दुल वडूद झोर, अहमद शाह मसूदचा पुतण्या आणि माजी प्रमुख मुजाहिदीन कमांडर या लढाईत मारले गेले.
दरम्यान, तालिबानने पंजशीरमधील काही भागावर कब्जा मिळविल्याचा दावा केला आहे. मात्र, रेझिस्टंस फ्रंटने हा दावा फेटाळला आहे.