श्रीलंकेचे अफगाणिस्तान प्रकरणी पहिले वक्तव्य
अफगाणिस्तानवर कब्जा केलेल्या तालिबानप्रकरणी आता भारताच्या आणखी एका शेजारी देशाचे विधान समोर आले आहे. पाकिस्तानसारखीच भूमिका श्रीलंकेने घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. श्रीलंकेने तालिबानच्या कथित बदललेल्या स्वरुपाचे ‘स्वागत’ केले आहे. स्वतःकडून देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता तालिबान करेल अशी अपेक्षाही श्रीलंकेकडून व्यक्त करण्यात आली आहे.
तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यावर सार्वत्रिक माफी देणे, महिलांच्या अधिकारांचे रक्षण करणे आणि कुठल्याच विदेशी नागरिकाला नुकसान न पोहोचविण्याच्या स्वतःच्या आश्वासनांवर तो कायम राहिल अशी अपेक्षा श्रीलंकेने व्यक्त केली आहे.
तालिबानने अलिकडेच पत्रकार परिषद घेत महिलांचे अधिकार, प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याचा सन्मान करणे तसेच युद्धात सामील असलेल्यांना माफ करण्याचे आश्वासन दिले होते. अफगाणिस्तान दहशतवाद्यांसाठी आश्रयस्थान ठरणार नाही याची खबरदारी घेऊ असेही तालिबानने म्हटले होते. तालिबानचा इतिहास अत्यंत भयावह राहिला असल्याने त्याच्यावर भरवसा कसा ठेवला जाऊ शकतो असा प्रश्न उपस्थित होत आहे. पण तालिबान समर्थक काही देश त्याच्याबद्दल सकारात्मक भूमिका मांडत आहे.
अफगाणिस्तानात अडकून पडलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अमेरिका, ब्रिटन, भारत, पाकिस्तान आणि संयुक्त राष्ट्रसंघाकडून मदत मागण्यात आल्याचे श्रीलंकेकडून सांगण्यात आले. सत्तेवर नियंत्रण मिळविल्यावर तालिबान स्वतःच्या सर्व आश्वासनांची पूर्तता करेल अशी अपेक्षा आहे. तालिबानने सार्वत्रिक माफीची योजना मांडली आहे. तसेच कुठल्याच विदेशी नागरिकाला नुकसान न पोहोचविण्याचे आश्वासन दिले आहे. अशा स्थितीत तालिबानने स्वतःच्या आश्वासनांची पूर्तता करण्याची विनंती करतो असे श्रीलंकेकडून म्हटले गेले आहे.
मान्यता नको
श्रीलंकेचे सरकार तालिबानबाबत मवाळ भूमिका घेत असले तरीही तेथील माजी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी देशाच्या सरकारला अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीला मान्यता देण्यावरून सतर्क पेले आहे. श्रीलंकेने अफगाणिस्तानसोबतचे सर्व संबंध संपुष्टात आणावेत. तालिबानच्या राजवटीत अफगाणिस्तान दहशतवाद्यांचे नवे केंद्र ठरणार अशी भीती सर्वांना असल्याचे विक्रमसिंघे यांनी म्हटले आहे.