अफगाणिस्तानच्या उपाध्यक्षांचा आरोप – देशाच्या सैन्याची तालिबानविरोधी मोहीम सुरू
वृत्तसंस्था / काबूल
अफगाणिस्तानच्या सैन्याने पाकिस्तानच्या सीमेवर तालिबानविरोधी मोहीम सुरू केली आहे. स्पिन बोल्डक जिलहय़ात अफगाणी सैनिक तालिबानी दहशतवाद्यांना भिडले आहेत. बोल्डकचा व्यापारी मार्ग, बाजारपेठ आणि सैन्य चौक्यांवर तालिबानने मंगळवारी कब्जा केला होता. अफगाण सैन्य त्यावर पुन्हा नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तानचे उपाध्यक्ष अमरुल्ला सालेह यांनी तालिबानला पाकिस्तानकडून रसद पुरविली जात असल्याचा आरोप केला आहे.
पाकिस्तानी वायुदलाने अफगाण सैन्य आणि वायुदलाला स्पिन बोल्डक जिल्हय़ातून तालिबानला हटविण्याचा प्रयत्न न करण्याचा इशारा दिला आहे. असा प्रयत्न झाल्यास पाकिसन याच्या प्रत्युत्तरादाखल कठोर कारवाई करणार असल्याचे म्हटले गेले. एवढेच नाही तर पाकिस्तानी वायुदलाने तालिबानला काही क्षेत्रांमध्ये हवाई मदतही पुरविली असल्याचे सालेह म्हणाले.
सालेह यांचे आरोप चुकीचे आहेत. आम्ही आमच्या अधिकारक्षेत्रात स्वतःचे सैनिक आणि लोकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या असल्याचा दावा पाकिस्तानच्या विदेशमंत्रालयाने केला आहे. पाकिस्तानने 20 वर्षांपासून स्वतःच्या भूमीवर तालिबानला पोसले असल्याचे म्हणत सालेह यांनी शेजारी देशाला लक्ष्य केले आहे. अफगाणिस्तानच्या सैन्याने तालिबानने ताब्यात घेतलेले काही जिल्हे पुन्हा स्वतःच्या नियंत्रणाखाली आणले आहेत. तालिबानला आता अफगाणिस्तानच्या सैन्याच्या कडव्या प्रतिकाराला तोंड द्यावे लागत आहे.
डेप्युटी गव्हर्नरांची हत्या
तालिबानाने शुक्रवारी चकमकीत कपिसा प्रांताचे डेप्युटी गव्हर्नर अजीज-उर-रहमान यांची हत्या केली आहे. तर बोल्डक जिल्हय़ात झालेल्या चकमकीनंतर कित्येक तालिबानी दहशतवादी जखमी झाले असून त्यांच्यावर पाकिस्तानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बोल्डक येथून बलुचिस्तानपर्यंत थेट मार्ग आहे. बलुचिस्तानात तालिबानच्या म्होरक्यांनी तळ ठोकला आहे. येथूनच अफगाणिस्तानासाठी दहशतवाद्यांची भरती केली जाते.
भारतीय विदेशमंत्र्यांनी घेतली भेट
भारताचे विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी ताश्कंदमध्ये अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ गनी यांची भेट घेतली आहे. अफगाणिस्तानात शांतात, स्थैर्य आणि विकासाबद्दल भारताची प्रतिबद्धता पुन्हा व्यक्त केल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे. भारत अफगाणिस्तानला मदत सुरूच ठेवणार आहे. भारताकडून 1.50 लाख टन गहू पाठविण्यात येणार आहे. अफगाणिस्तानच्या समर्थनार्थ भारत क्षेत्रीय सहमती मजबूत करण्यासाठी काम करत राहणार असल्याचे गनी यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.
अमेरिकेला उपरती
तर तालिबानशी लढण्याकरता अमेरिकेच्या सैनिकांना मदत करणारे नागरिक आता चिंतेत आहेत. तालिबानशी लढण्यासाठी मदत करणाऱया नागरिकांना स्वतःच्या सैनिकांसाब्sात देशाबाहेर काढणार असल्याचे अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले आहे. विशेष व्हिसा मिळविण्याच्या प्रक्रियेत असलेल्या लोकांसाठी अफगाणिस्तानमधून जुलै अखेरपासून उड्डाणे सुरू केली जाणार असल्याचे अधिकाऱयाने म्हटले आहे.