ऑनलाईन टीम / ब्रसेल्स :
अफगाणिस्तानात सत्ता काबिज केल्यानंतर तालिबानला मान्यता मिळावी, यासाठी संघटनेचे प्रयत्न सुरू आहेत. तालिबानकडून सत्ता स्थापनेसाठी युरोपियन महासंघासोबत चर्चा सुरू असल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर युरोपियन महासंघाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तालिबान्यांसोबत आम्ही कोणतीही चर्चा केली नाही. त्यांना मान्यता देणे तर दूरचं, असे महासंघाच्या आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी म्हटले आहे.
लेयेन म्हणाल्या, सत्ता स्थापनेसाठी मान्यता मिळावी, यासाठी तालिबानी संघटनेचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पाश्चिमात्य देश तालिबानला जवळ करत नाहीत. अमेरिकेनं अफगाणिस्तान सरकारची बँक खाती गोठवली आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही तालिबान सरकारला कर्ज देण्यास नकार दिला आहे. युरोपियन महासंघाने तालिबानला मान्यता दिलेली नाही.
दरम्यान, अफगाणिस्तानमधील जनतेच्या जीवनमानाचा दर्जा उंचवण्यासाठी यावषी अफगाणिस्तानला 57 मिलियन युरोजची मदत देण्यात आली. मानवी हक्क जपले जावेत, यासाठी या मदतीत वाढ करण्यात येईल, असेही लेयेन म्हणाल्या.