इस्लामिक देशांच्या परिषदेत तालिबान निमंत्रित
@ वृत्तसंस्था / इस्लामाबाद
जगात एकाकी पडलेल्या अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीवर पाकिस्तानचा असलेला वरदहस्त कुणापासून लपून राहिलेला नाही. इस्लामाबादमध्ये 19 डिसेंबर रोजी ऑर्गनायजेशन ऑफ द इस्लामिक कंट्रीजची (ओआयसी) परिषद होणार आहे. या परिषदेकरता पाकिस्तानने अफगाण तालिबानला निमंत्रित केले आहे. याप्रकरणी उर्वरित मुस्लीम देशांची प्रतिक्रिया कशाप्रकारची असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
तालिबानच्या राजवटीत पाकिस्तान समवेत जगातील कुठल्याच देशाने अद्याप मान्यता दिलेला नाही. तालिबानला निमंत्रित करण्यात आल्याने काही मुस्लीम देश या परिषदेपासून अंतर राखणार असल्याची चर्चा आहे. अशा स्थितीत पाकिस्तानला तालिबानला दिलेले निमंत्रण मागे घ्यावे लागू शकते.
अर्थव्यवस्थेची चिंता
तालिबानच्या विदेश विभागानुसार अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था, बँकिंग प्रणाली आणि अन्य देशांसोबतचे संबंध हे मुद्दे या परिषदेत उपस्थित होण्याची शक्यता आहे. परिषदेत या मुद्दय़ांवर सर्व देश आणि इन्य संघटनांनी विचार करावा असे तालिबानने म्हटले आहे. ओआयसीत सामील मुस्लीम देशांसह अमेरिका, रशिया, ब्रिटन, युरोपीय महासंघ आणि जागतिक बँकेलाही या परिषदेकरता निमंत्रित करण्यात आले आहे. काही मानवाधिकार संघटनाही यात सामील होऊ शकतात.
अफगाण लोकांचा आक्षेप
अफगाणिस्तानातील संघटना नॅशनल सॉलिडॅरिटी मूव्हमेंटचे अध्यक्ष सैयद इशाक गिलानी यांनी तालिबानला निमंत्रण पाठविण्याच्या पाकिस्तानच्या कृत्यावर आक्षेप घेतला आहे. जगातील अनेक मुस्लीम देश अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीला मान्यता देण्यास तयार नाहीत. बहुतांश देशांसोबत अफगाणिस्तानचे चांगले संबंध देखील नसल्याचे ते म्हणाले.
पाकिस्तानच्या अडचणी वाढणार
अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीला आता 100 दिवसांहून अधिक काळ लोटला आहे. पण अद्याप कुठल्याच देशाने या राजवटीला मान्यता दिलेली नाही. तालिबानी राजवटीने महिला तसेच मानवाधिकारासंबंधी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी अशी बहुतांश देशांची इच्छा आहे. पण तालिबानकडून या आश्वासनांची पूर्तता होताना दिसून येत नाही. तालिबानी राजवटीला मान्यता द्यावी अशी विनवणी पाकिस्तान जागतिक समुदायाला वारंवार करतोय. पण त्याच्या प्रयत्नांकडे साशंक नजरेने पाहिले जात आहे.