महिलांची फ्री स्टाईल हाणामारी ः खुर्च्या आपटून घातला धिंगाणा
प्रतिनिधी/ सातारा
सोमवारी सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास सातारा तालुका पोलीस ठाण्यात दोन गटात घरगुती करणावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने या गटातील दोन्ही महिलांमध्ये पोलीस ठाण्यात फ्री स्टाईल हाणामारी झाली. यामुळे पोलीस ठाण्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. हा संपूर्ण प्रकार शांत करण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू होता. परंतु पत्रकारांनी येथील फोटो व व्हिडिओ काढण्यास सुरूवात केलेले पाहून महिला पोलीस कर्मचारी चांगलीच भडकली. तिने फोटो व्हिडिओ काढण्यास विरोध करत पत्रकारांना सज्जड दम भरला.
पोलीस ठाण्यात गेल्यानंतर खाकी वर्दी दिसताच अनेकांच्या तोंडातून लवकर शब्द बाहेर पडत नाही. परंतु काही वेळा पोलीस समोर असूनही काही वाद शांत होत नाहीत. असाच प्रकार सोमवारी तालुका पोलीस ठाण्यात घडला. घरगुती करणावरून सुरू झालेला वाद थेट पोलीस ठाण्यात पोहचला. दोन्ही गटातील महिला आक्रमक भूमिका घेत बोलत होत्या. नक्की कोण योग्य व अयोग्य हे कळत नव्हते. इतक्यात आक्रमक महिलांनी एकमेकीच्या केसांना धरले तोच बघता बघता फ्री स्टाईल हाणामारी सुरू झाली. दोघीही मारामारी करत असल्याने पोलीस ठाण्यातील वातावरण काही सेंकदात तणावपूर्ण झाले. कोणाला धरायचे, कोणाला सोडायचे हे कळेना. महिला कर्मचारी उपस्थित नसल्याने पुरूष कर्मचाऱयांना ही भांडणे सोडवणे भाग पडले. आरडाओरडा करून महिलांनी पोलीस ठाणे दणाणून सोडले होते. इतर तक्रारी देण्यासाठी आलेले तक्रारदार संपूर्ण प्रकार पाहून पोलीस ठाण्याच्या दारात उभे होते. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत दोन तासांनी हा वाद शांत झाला.
कोणाविरूद्ध गुन्हा दाखल नाही
पोलीस ठाण्यात घडलेल्या या प्रकाराबाबत अद्याप कोणाविरूद्ध गुन्हा दाखल झालेला नाही. उलट पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून आले. पोलिसांना सुमोटा अंतर्गत गुन्हा दाखल करणे गरजेचे होते. तरीही दोन्ही गटातील महिलांवर कोणतीही कारवाई झालेली नाही.
फोटो, व्हिडिओ का काढताय रे
पोलीस ठाण्यातील हा वाद शांत करण्यासाठी पोलिसांनी महिलांना ठाण्याबाहेर जाण्यास सांगितले. महिला बाहेर येऊन पुन्हा धिंगाणा घालु लागला. हे पाहून उपस्थित पत्रकारांनी फोटो, व्हिडिओ बनवण्यास कॅमेरा हातात घेतला. हे पाहून महिला पोलीस कर्मचारी चांगली भडकली. तिने फोटो, व्हिडिओ का काढताय रे, आत या कारवाई करते असे म्हणत सज्जड दम भरला. यामुळे हा संपूर्ण प्रकार पोलीस ठाण्याच्या बाहेर जाऊ नये यासाठी पोलीस प्रयत्न करत असल्याचे दिसले.