बेळगाव \ प्रतिनिधी
तालुक्मयाच्या पश्चिम भागात ऊस तोडणीला सुरुवात झाली असून ऊस तोडणीसाठी महाराष्ट्रातील ऊस तोडणी करणारे मजूर दाखल झाले असून ऊस तोडणीसाठी लगबग सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
तालुक्मयातील पश्चिम व पूर्व भागात उसाचे क्षेत्र आहे. पश्चिम भागातील सर्रास ऊस हा कारखान्यांना दिला जातो. त्यासाठी पश्चिम भागातील कुदेमनी, उचगाव, बाची, तुरमुरी, कल्लेहोळ, गोजगा, मण्णूर, आंबेवाडी आदी भागात ऊस तोडणी सुरू असलेली पहायला मिळत आहे. साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला सुरुवात झाली की, दरवर्षी महाराष्ट्रातील बीड, उस्मानाबाद, परभणी, जालना, हिंगोली, नंदुरबार या जिल्हय़ांतून हजारो ऊस तोडणी कामगार आपल्या कुटुंबासह सीमाभागात दाखल झाले आहे. गुरुवारी गोजगा व आंबेवाडी शिवारात परभणी जिल्हय़ातील ऊस तोडणी मजूर तोडणी करताना पहायला मिळाले. सध्या नदीकाठाशेजारी उसाची तोडणी सुरू आहे. मात्र येत्या दिवसात सर्वच उसाची तोडणी करण्यात येणार आहे. विशेष करून पश्चिम भागातील ऊस गुऱहाळे नाहीत त्यामुळे येथील ऊस हा साखर कारखान्यांना पाठविला जातो.
यंदा ऊस तोडणी वेळेत सुरू
गतवषी अतिवृष्टीमुळे ऊस पिकाला मोठा फटका बसला होता. त्यामुळे ऊस तोडणी देखील लांबणीवर पडली होती. मात्र यंदा ऊस तोडणी वेळेत सुरू झाली आहे. कोरोनामुळे ऊस तोडणी मजूर मिळतील की नाही? याचीच चिंता शेतकऱयांना लागली होती. मात्र ऊस तोडणी मजूर उसाच्या फडात दाखल झाल्याने शेतकऱयांची चिंता मिटली आहे.