सर्वत्र भक्तिमय वातावरण : दर्शनासाठी पहाटेपासून रांगा : विविध ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन
वार्ताहर /किणये
तालुक्यात शुक्रवारी गणेश जयंती मोठय़ा उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. विविध गावागावांमधील गणेश मंदिरांमध्ये अभिषेक, पूजा-अर्चा, भजन, प्रवचन, कीर्तन तसेच जागर भजन आदी कार्यक्रम झाले.
गणेश जयंतीनिमित्त शुक्रवारी सकाळपासूनच भाविकांनी गणेश मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती. दिवस अगदी भक्तिभावाने भक्तमंडळ गणरायाचे दर्शन घेतानाचे चित्र सर्वत्र पहावयास मिळाले. काही गावांमध्ये तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले तर काही ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. गणेश जयंतीचा सोहळा साजरा करण्यासाठी अनेक गावांमध्ये असलेल्या गणेश मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली होती. सकाळी अभिषेक, गणहोम व दुपारी गणेश जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.
मंडोळीत गणेश जयंती
मंडोळी येथील गणेश मंदिरात, गणेश मंदिर जीर्णोद्धार ग्रामस्थ मंडळ यांच्यावतीने गुरुवार व शुक्रवार असे गणेश जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी रात्री हभप मारुती पाटील महाराज यांचे कीर्तन झाले. त्यानंतर ज्ञानेश्वर माऊली महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला.
शुक्रवारी पहाटे वारकरी सांप्रदायच्यावतीने काकड आरती करण्यात आली. त्यानंतर गणहोम करण्यात आला. श्री गणेश जन्मोत्सव झाल्यानंतर दुपारी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते.
येळ्ळूर सार्वजनिक गणपती मंदिर
रामदेव गल्ली, येळ्ळूर येथील सार्वजनिक गणपती मंदिर व श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडळ यांच्यावतीने गणेश जयंती साजरी करण्यात आली. गणपती बाप्पाचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर गणेश जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.
स्वामीनगर मच्छे येथील श्वेतार्क गणेश मंदिर, पिरनवाडी येथील गणेश मंदिर, किणये, बेळगुंदी, रणकुंडये, कडोलीसह तालुक्याच्या सर्वच भागात असलेल्या गणपती मंदिरांमध्ये गणेश जयंती साजरी केली. रात्री या मंदिरांमध्ये भजन, प्रवचन, कीर्तन व जागर भजनाचे कार्यक्रम झाले.
उचगाव परिसरात गणेश जयंती
उचगाव ः माघ महिन्यातील माघी गणेश जयंतीला एक विशेष महत्त्व असल्याने आणि सर्वांचे आराध्य दैवत बाप्पा गणेश असल्याने उचगाव परिसरातील प्रत्येक गावांमधून असलेल्या गणेश मंदिरांमधून परंपरेनुसार गणेश जयंतीचा सोहळा अभिषेक, विविध पूजा, आरती व कार्यक्रमाने भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.
मार्कंडेय तिर्थक्षेत्र गणेश मंदिर
उचगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील गणेश मंदिरामध्ये पहाटेपासूनच अभिषेक, पूजा कार्यक्रमाला प्रारंभ झाला. सकाळपासूनच या मंदिरांमध्ये भाविक भक्तांच्या दर्शनासाठी रांगा लागल्याचे चित्र व यानंतर दुपारी महाप्रसादासाठी लागलेल्या रांगांचे चित्र दिसून येत होते. याबरोबरच मध्यवर्ती गणेश मंदिरांमध्ये भाविक भक्तांनी गणेश मूर्तीचे पूजन व आरती करून दर्शन घेतले. तसेच बेळगाव-वेंगुर्ला या मार्गावरील मार्कंडेय तीर्थक्षेत्रावर असलेल्या मार्कंडेय गणेश मंदिरामध्ये या परिसरातील उचगाव, सुळगा, कल्लेहोळ, तुरमुरी, बाची, बसुर्ते अशा गावातील नागरिक मंदिरात येऊन दर्शन घेतले. सदर मंदिर हे या महामार्गावरती असल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱया अनेक भाविक भक्तांनी आपली वाहने थांबवून दर्शन घेऊनच पुढे जातानाचे चित्र दिसून येत होते.
तुरमुरी
या गावांमध्ये गणेश जयंतीचा उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. गणपत गल्लीतील गणेश मंदिरामध्ये पहाटेच विधीपूर्वक भाविक भक्तांच्या उपस्थितीत गणेश जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जन्म सोहळा मोठय़ा थाटात पार पडला. तर तुरमुरी गावच्या कॉलनीमध्ये असलेल्या गणेश मंदिरांमध्ये गणेश जयंती साजरी करण्यात आली. या ठिकाणी भाविक भक्तांच्यासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी तुरमुरी तसेच कोनेवाडी अशा जवळपासच्या भाविक भक्तांनी या मंदिरात येऊन दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.
सुळगा-हिंडलगा
येथील गणपत गल्लीतील गणेश मंदिरामध्ये प्रतिवषी गणेश जयंतीचा सोहळा मोठय़ा उत्साही वातावरणात पार पडतो. शुक्रवारी सकाळी सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत अभिषेक, महापूजा आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व ग्रामस्थ, महिला, भाविकभक्त उपस्थित होते. दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गावातील सर्व भाविक भक्तांनी या मंदिरात येऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.