बस्तवाड (ह.) भागासह काही शिवारात धूळवाफ पेरणीला प्रारंभ
वार्ताहर/ किणये
तालुक्यात खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतीची धांदल सुरू झाली आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून वळीव पावसाने विश्रांती घेतल्यामुळे मशागतीच्या कामांना जोर आला आहे. तालुक्याच्या बस्तवाड, हलगा परिसरात धूळवाफ पेरणी करण्यास सुरुवात झाली आहे.
वळीव पावसामुळे शेत-शिवारांमध्ये पाणी साचले होते. यामुळे मशागतीच्या कामांमध्ये व्यत्यय निर्माण झाला होता. यंदा वळिवाचा पाऊस जाणार की नाही, कमी होणार की नाही, याची चिंता बळीराजाला लागून राहिली होती.
ढगाळ वातावरण व वळिवाचे सावट शेतकऱयांवर होतेच. खरीप हंगाम साधायचा कसा या विवंचनेत शेतकरी होते. कारण गेल्या दीड महिन्यांपासून अधूनमधून वळीव पाऊस होत आहे. आठ दिवसांपूर्वी झालेल्या वळीव पावसाने तालुक्याला चांगलेच झोडपून काढले होते. या पावसात बिन्स, मिरची, ज्वारी व इतर भाजीपाला पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते.
सध्या वळिवाने विश्रांती घेतल्यामुळे शेतातील कामांना वेग आला आहे. शेतकरी ट्रक्टरच्या साहाय्याने शिवारात रोटरी व कल्टीचे काम करीत आहेत. ट्रक्टरला प्रति तासाला 500 ते 600 रुपये असा दर देण्यात येत आहे, अशी माहिती काही शेतकऱयांनी दिली आहे.