वार्ताहर/ किणये
तालुक्यात मंगळवारी घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन भक्तिमय वातावरणात करण्यात आले. अगदी जड अंतकरणाने भक्तांनी बाप्पाला निरोप दिला. कोरोनाचे संकट दूर कर अशी मागणी विघ्नहर्त्या गणेशाकडे केली. दुपारी तालुक्याच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. तरीही बाप्पाच्या विसर्जन सोहळय़ात भक्तांचा उत्साह दिसून आला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष भक्तांनी केला होता.
यंदा कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे प्रशासनाने मिरवणुकीवर बंदी आणली आहे. सरकारच्या नियमावलीचे पालन करत गेल्या 11 दिवसांपासून तालुक्याच्या विविध गावांत गणेशोत्सव आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. मंगळवारी अनंत चतुदर्शीच्या दिवशी सकाळपासूनच घरगुती गणेश मूर्ती विसर्जनाला सुरुवात करण्यात आली. सार्वजनिक व खासगी विहिरी, नदी, नाले, तलाव आदी ठिकाणी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येत होते.
गेल्या 15 दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. यामुळे नदी, नाले, व तलावांमध्ये बऱयापैकी पाणी आहे. यामुळे गणपतीचे विसर्जन करणे भक्तांसाठी सोयीस्कर ठरले. कोरोनाचा प्रसार वाढत असला तरी गणेशभक्तांचा उत्साह कोठेही कमी होताना दिसून आला नाही. सामाजिक अंतर ठेवून त्याच उत्साहात व जल्लोषात बाप्पांचा जयजयकार करीत विसर्जन करण्यात येत होते.
कोरोनाच्या संकटामुळे यंदा गणरायाचे स्वागतही साध्या पद्धतीने करण्यात आले होते. तसेच विसर्जन मिरवणुकाही काढण्यात आल्या नाहीत. मात्र भक्तांमध्ये बाप्पांविषयी उत्साह दिसून आला. गेले 11 दिवस रोज सकाळी व सायंकाळी सार्वजनिक मंडपामध्ये महाआरती करण्यात येत होती. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून व नागरिकांची टाळण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा महाप्रसादाचे कार्यक्रम रद्द केले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपती मूर्तीही कमी आकाराच्या होत्या.
सोमवारी सायंकाळपासूनच विसर्जनाची तयारी कार्यकर्त्यांनी सुरू ठेवली होती. मिरवणूक नसली तरी विविध गावांमध्ये ट्रक्टर ट्रॉली, टेम्पो आदी वाहने सजवून ठेवण्यात आली होती. या सजविलेल्या वाहनातून गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करत कार्यकर्त्यांनी विसर्जनासाठी जातानाचे चित्र पहावयास मिळाले. किणये परिसरातील किणये, बहाद्दरवाडी, शिवनगर, रणकुंडये आदी गावांतील भाविकांनी सार्वजनिक व घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन मुंगेत्री नदीमध्ये केले.
वाघवडे भागातील गणेश मूर्तींचे विसर्जन मुंगेत्री नदीच्या पुलाच्या ठिकाणी करण्यात आले. मच्छे परिसरातील गणेशमूर्ती ब्रह्मलिंग मंदिराजवळील तलावात विसर्जित करण्यात आल्या. या तलावाकडे जाण्यासाठी ग्राम पंचायतीमार्फत जेसीबीच्या साहाय्याने रस्त्याचे काम करण्यात येत होते. तसेच पंचायतीने प्रकाशासाठी विद्युत बल्बही बसविले होते. पिरनवाडी, खादरवाडी भागातील गणेशमूर्ती खादरवाडी गावच्या तलावात विसर्जन करण्यात आल्या. दुपारनंतर पिरनवाडीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी श्रींच्या मूर्ती विसर्जनासाठी जक्कीनहोंडा येथे नेण्यात आल्या. मंडोळी तलावाच्या ठिकाणी भक्तांची गर्दी दिसून आली.
बाप्पाचे विसर्जन करण्याआधी विधिवत पूजा अर्चा करून बापाला नैवेद्य दाखविण्यात येत होता. त्यानंतर तलाव, नदी, नाल्याचे पाणी तांब्याच्या कळशीतून घेऊन गणे गणे मोरया म्हणून बाप्पाच्या मस्तकावर सोडण्यात येत होते. गणेशमूर्तीचा आकार कमी असल्याने सार्वजनिक मंडळाच्या मूर्ती विसर्जन करणेही सोयीस्कर झाले होते.
बेळगुंदी, सोनोली, बोकनूर, यळेबैल या परिसरातील गणेशाचे विसर्जन मार्कंडेय नदीच्या ठिकठिकाणी असलेल्या पुलाजवळ करण्यात आले. कर्ले, कावळेवाडी, जानेवाडी, बिजगर्णी आदी परिसरात सकाळपासूनच विसर्जनाला सुरुवात झाली होती. नावगे येथील सार्वजनिक गणेशमूर्ती व घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन गावच्या तलावात करण्यात आले.
अगदी साध्या पद्धतीने व तितक्याच उत्साहात बाप्पाला निरोप देण्यात आला. वडगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या पोलिसांनीही तालुक्याच्या मुख्य गावांमध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.