मंदिरांमध्ये भजन, प्रवचन, कीर्तनाचे कार्यक्रम : आकर्षक विद्युत रोषणाई-फुलांची सजावट : अनेक ठिकाणी महाप्रसाद
वार्ताहर /किणये
तालुक्यात रविवारी रामनवमी मोठय़ा उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. अनेक गावांतील श्रीराम मंदिरात व विविध मंदिरांमध्ये राम जन्मोत्सव व सोहळा साजरा करण्यात आला. रामनवमीनिमित्त मंदिरांमध्ये भजन, प्रवचन, कीर्तन आदी कार्यक्रम झाले.
भाविकांनी रविवारी सकाळपासूनच प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी मंदिरांमध्ये गर्दी केली होती. दिवसभर राम लक्ष्मण जानकी, जय बोला हनुमान की, प्रभू श्रीरामचंद्र की जय असा जयघोष सुरू होता.
रविवारी दुपारीही वळीव पावसाने हजेरी लावली. पावसातही भाविकांचा उत्साह कायम दिसून आला. काही गावांमध्ये रथ मिरवणूक काढण्यात आली.
रामदेव गल्ली, पिरनवाडी येथील राम मंदिर व्यवस्थापन कमिटी यांच्यावतीने राम मंदिरात रामनवमी उत्सव शनिवार व रविवार असे दोन दिवस साजरा करण्यात आला. शनिवारी रात्री 9 वाजता राम मंदिरात निट्टूर (ता. चंदगड) येथील भावेश्वरी महिला मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला.
रविवारी सकाळी राम, लक्ष्मण, सीता व हनुमान मूर्तींची विधिवत विशेष पूजा करण्यात आली. दुपारी 12 वाजता राम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी महिलांनी राम जन्मला ग सखे, हा पाळणा म्हटला.
रामनवमीनिमित्त राम मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. संपूर्ण मंदिराला फुलांची सजावट करून मंदिर परिसर व गल्लीत भव्य मंडप उभारला होता.
पिरनवाडीतील एकमेव राम मंदिर
दुपारी एकनंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पिरनवाडी परिसरात हे एकमेव राम मंदिर असल्याने पंचक्रोशीतील भाविकांची मोठय़ा संख्येने गर्दी झाली होती. रात्री 8 वाजता कलादर्पण प्रस्तूत ‘मन रामरंगी रंगले, एक स्वरानुभूती’ हा कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमाचे निवेदक किशोर गजगेश्वर होते. कल्याणी गजगेश्वर व इतर सहकारी कलकारांनी एकापेक्षा एक सुंदर गीते सादर करून उपस्थितांची वाहव्वा मिळविली.
किणये येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात रामनवमी साजरी करण्यात आली. विविध मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाई मूर्तीचे पूजन करण्यात आले. पाळणा बांधून आकर्षक सजावट केली होती. महिलांनी पाळणा गीत म्हणून राम जन्मोत्सव सोहळा साजरा केला. यावेळी देवेंद्र हुंदरे, डॉ. कृष्णा पाटील, महादेव बिर्जे, अनिल होसूरकर व इतर उपस्थित होते.
कणबर्गी रामतीर्थ मंदिर
कणबर्गी येथील रामतीर्थ मंदिरात रामनवमी रविवारी उत्साहात साजरी करण्यात आली. येथील डोंगर पायथ्याशी असलेल्या निसर्गरम्य रामतीर्थ मंदिर परिसरात हा कार्यक्रम झाला. या निमित्ताने सकाळी 8 वाजता अभिषेक तर दुपारी 12 वाजता जन्म सोहळय़ाचा पाळणा झाला. दुपारी 12 ते 5 पर्यंत महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
यावेळी मोठय़ा संख्येने भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. शनिवारी दुपारी 4 ते 8 या वेळेत श्रीराम मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान भाविकांनी दर्शन घेतले. याप्रसंगी भाविक, ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
धामणे येथे उत्साहात
येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात रामनवमीनिमित्त प्रभू श्रीराम जन्म सोहळा उत्साहाने साजरा करण्यात आला. रविवार दि. 10 रोजी सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सांप्रादायिक भजनाचा कार्यक्रम हभप मारुती महाराज सांबरेकर यांच्या सानिध्यात पार पडला.
दुपारी 12 वाजता प्रभू श्रीरामांचा जन्म सोहळा, पाळणा व पुष्पवृष्टी करून भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. त्यानंतर आरती होऊन प्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी हभप यल्लाप्पा भोसले, जयपाल होनुले, गुंडू जायाण्णाचे, ग्राम पंचायत सदस्य पंडित पाटील, हभप परशराम रेमाणाचे, रघुनाथ बुवाजी आणि गावातील वारकरी व महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.