ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने धूळवड : कोरोनाचे संकट दूर व्हावे, असे घातले साकडे : कोरोनाचे सावट असतानाही उत्सव
वार्ताहर / किणये
तालुक्मयात होलिकोत्सवाला उत्साहात व पारंपरिक पद्धतीने सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागात सोमवारी धुळवड साजरी करण्यात आली. प्रशासनाच्या नियमावलींचे पालन करून विविध गावांमध्ये साध्या पद्धतीने होळी सणाला सुरुवात करण्यात आली. होळी दहन करीत असताना कोरोनाचे संकट कायमस्वरुपी दूर व्हावे, असेच बहुतांशी गावातील ग्रामस्थांनी साकडे घातले आहे.
होळी दहनाच्या एक दिवस आधीपासूनच होळीसाठी विविध प्रकारची लाकडे, फांद्या, गोवऱया (शेणी) जमविण्यात आल्या होत्या. रविवारी सायंकाळी तालुक्मयाच्या काही गावांमध्ये होळीचे दहन करण्यात आले.
आपल्या मनातील वाईट आचारविचार होळीप्रमाणे जळून खाक व्हावेत, वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करण्याचा हा होळी सणाचा दिवस. याप्रमाणेच वाईट प्रवृत्तीचे दहन करून नवनवीन संकल्पांचे नियोजन ग्रामीण भागातील जनतेने केले आहे.
तालुक्मयाच्या काही गावांमध्ये होळी कामाण्णाजवळ लाकडी होळी उभारण्याची परंपरा आहे. रविवारी सायंकाळीच काही गावात होळी उभारण्यात आली. यावेळी हलगी व पारंपरिक वाद्यांचा गजर झाला. होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. काही गावांमध्ये सोमवारी सकाळी होळी उभारण्यात आली.
कांही गावांत वार पाळणूक
ग्रामीण भागात होळीचा सण वेगवेगळय़ा पद्धतीने साजरा करण्यात येतो. हा सण साजरा करण्याची काही गावांमध्ये फार पूर्वीपासूनची परंपरा आहे. ती आजही जपण्यात येत आहे. पाच दिवस शेतकरी शेतशिवारातील कामे बंद ठेवून वार पाळणूक करतात. होळी कामाण्णाजवळ विविध धार्मिक, आध्यात्मिक कार्यक्रम, स्पर्धा, खेळ, नाटय़प्रयोग व मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवारी दुपारी बहुतांशी भागात हलगी वाद्यासह मिरवणूक काढून धुळवड साजरी करण्यात आली. धुळवड खेळताना तरुण व बालचमू एकमेकांवर माती उडवितात. ही परंपरा आजही जपण्यात येते. सध्या अनेक गावांमध्ये डांबरीकरण व काँक्रिटचे रस्ते झाल्यामुळे गल्ल्यांमध्ये माती उपलब्ध झाली नव्हती. तरीही तरुणांनी शेतशिवारातील माती आणून धुळवडीचा आनंद
लुटला.
कंग्राळी खुर्द येथे रंगपंचमी
कंग्राळी खुर्द : परिसरामध्ये होळीचा सण आणि रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. रविवारी सायंकाळी महालक्ष्मी मंदिर परिसरातील होळी कामाण्णा मंदिर येथे होळी उभारण्यात आली आणि शेणाच्या गोवऱया घालून ती पेटविण्यात आली. प्रथमतः गावचे वतनदार फरचीगौडा घराण्यातील कल्लाप्पा पाटील, शंकर पाटील, नरेश पाटील, विनायक पाटील यांनी मंदिरामध्ये विधीवत पूजा करून होळीला पुरण पोळीचा नैवेद्य दाखविला. त्यानंतर गावातील भाविकांनी गोवऱया होळीमध्ये वाहिल्या आणि नैवेद्य दाखविला.
कोरोना आणि निवडणूक अचारसंहिता यामुळे रंगपंचमी साधेपणाने
रविवारी होळी सण झाला तर सोमवारी कंग्राळी खुर्द येथे ग्रा. पं. सदस्यासाठी पोटनिवडणुकीचे मतदान आचारसंहिता आणि कोरोनाचे सावट यामुळे यावर्षी रंगपंचमी साधेपणाने साजरी करण्यात आली. गावातील बालकांनी रविवारी सायंकाळपासून रंगपंचमीची तयारी केली होती. यावेळी फुग्यामध्ये अनेक नमुण्यांचे रंग मिसळून ते एकमेकांच्या अंगावर टाकण्यात येत होते.
सोमवारी सकाळपासून बालगोपालांसहित युवक, युवती आणि वयोवृद्धसुद्धा रंग खेळण्यात आणि एकमेकांना होळीच्या शुभेच्छा देत होते. यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. तर युवकांनी विविध मुखवटे घालून रंग खेळत अनेकांची करमणूक केली. रंग खेळण्यासाठी गावात युवक युवती आणि बालगोपाल अनेक ठिकाणी घोळके करून रंग खेळत होते. तर काही ठिकाणी ध्वनीक्षेपकावरून होळीची गाणी लावून ठेका धरत असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळाले.
गुंजेनहट्टी येथील होळी कामाण्णा यात्रा साधेपणाने
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सर्व नियमांचे पालन करत गुंजेनहट्टी येथील श्री होळी कामाण्णा देवालयाची यात्रा सुरळीत पार पडली. संपूर्ण देशभर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन गुंजेनहट्टी येथील होळी कामाण्णा देवस्थान कमिटीने यात्रा रद्द केल्याची घोषणा केली होती. त्यामुळे बहुतांशी भाविकांनी यात्रेला उपस्थिती दर्शविली नाही. त्यामुळे थोडय़ाफार भाविकांच्या उपस्थितीत यात्रा सुरळीत पार पडली. यावेळी यात्रा कमिटीच्या कार्यकर्त्यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मास्कशिवाय कोणालाही मंदिर परिसरात प्रवेश दिला नाही. शिवाय मंदिर परिसरात भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात आली होती. कार्यकर्त्यांच्या शिस्तीमुळे भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे. तसेच काकती पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून यात्रा सुरळीत पार पडण्यास महत्त्वाची भूमिका बजावली.यावेळी भाविकांची उपस्थिती नगण्य होती. त्यामुळे कोठेही वाहतूक ठप्प झाली नाही. आणि भाविकांनीही समाधानाने देवालयाचे दर्शन घेतले.