टोनी रॉड्रिग्ज यांचा पुढाकार
प्रतिनिधी /पणजी
ताळगावातील शेतकऱयांना भात कापणीसाठी हार्वेस्टिंग यंत्र पुरविण्यात स्थानिक काँग्रेस नेते टोनी रॉड्रिग्ज यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी सर्व ती आर्थिक मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
भात कापणीवेळी हार्वेस्टिंग यंत्र वापरण्यासाठी सरकारतर्फे 50 टक्के सवलतीच्या दरात यंत्र पुरविण्यात येते. परंतु कोविड काळात शेतकरी आर्थिक संकटात असल्यामुळे उर्वरित अर्धे भाडे भरण्याचीसुद्धा त्यांची कुवत नव्हती. त्यामुळे इच्छा असतानाही ते यंत्र वापरू शकत नव्हते. त्यातून अनेक शेतकऱयांनी पारंपरिक पद्धतीनेच कापणी करण्याचा विचार चालविला होता. त्यांची ही विवंचना लक्षात येताच रॉड्रिग्ज यांनी पुढाकार घेत सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन दिले. त्यासाठीचे अर्धे भाडे स्वतः भरण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे.
त्यांतर्गत शुक्रवारपासून यंत्राद्वारे भातकापणी सुरू करण्यात आली. त्यावेळी पणजीचे माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक उदय मडकईकर, माजी नगरसेवक दया कारापूरकर, नागेश करीशेट्टी आदींची उपस्थिती होती.
त्याप्रसंगी बोलताना श्री. रॉड्रिग्ज यांनी आपण दरवर्षी अशाप्रकारे कापणीसाठी येथील स्थानिकांना यंत्र पुरवत होतो. त्यासाठीचे भाडे सरकार व शेतकरी यांच्याकडून आपणास उपलब्ध होत होते. परंतु यंदा त्यांची आर्थिक स्थिती पाहता त्यांना सर्वतोपरी साहाय्य करण्याचे ठरविले, असे त्यांनी सांगितले. आर्थिक विवंचनेत असताना अशाप्रकारे मदतीसाठी पुढाकार घेतल्याबद्दल सर्व शेतकऱयांनी श्री. रॉड्रिग्ज यांच्याप्रती आभार व्यक्त केले आहेत.