ताशी यांगजोम ही अरूणाचल प्रदेशची रहिवासी. 37 वर्षांची ताशी गिर्यारोहक आहे. ताशी दिरांग इथल्या राष्ट्रीय गिर्यारोहण आणि संबद्ध क्रीडा संस्थेत प्रशिक्षक आहे. ती एव्हरेस्ट सर करणारी या संस्थेची नववी गिर्यारोहक बनली आहे. ताशीचं नाव आता एव्हरेस्ट सर करणार्या मोजक्या महिलांच्या यादीत समाविष्ट झालं आहे. कोरोनाकाळात मिळवलेलं हे यश आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असल्याचं ताशी सांगते. कोरोनाच्या या कठीण काळात ताशीने आपलं मनोधैर्य खचू दिलं नाही. तिच्या पाच वर्षांच्या परिश्रमांना अखेर यश आलं आणि या जिद्दी महिलेने माउंट एव्हरेस्ट सर करून दाखवलं. ताशी अकरा मे रोजी सकाळी सहा वाजता एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचली आणि तिच्या आयुष्यात नवा सूर्योदयच झाला. आज ताशीला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. तिचं सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. ताशीने चार एप्रिलला एव्हरेस्टची चढाई सुरू केली आणि तब्बल 37 दिवसांच्या अथक मेहनतीनंतर तिने हे शिखर सर केलं. हे शिखर सर केल्यानंतर जग जिंकल्याचा आनंद तिच्या चेहर्यावर दिसत होता.
ताशी 2016 मध्ये राष्ट्रीय गिर्यारोहण आणि संबद्ध क्रीडा संस्थेत रूजू झाली. अगदी तेव्हापासूनच ती एव्हरेस्ट सर करण्याचं स्वप्न जगत आली. ताशीला गेल्या वर्षीच हे शिखर सर करायचं होतं. मात्र कोरोनामुळे ही मोहीम तिला पुढे ढकलावी लागली. मात्र त्यामुळे ताशी स्वस्थ बसली नाही. कोरोनामुळे आपलं उद्दिष्ट पुढे ढकललं जाऊ शकतं मात्र हे स्वप्न हवेत विरू शकत नाही, असं ताशीचं म्हणणं आहे. मला सर्वोच्च स्थानी जाऊन भारताचा तिरंगा फडकवायचा होता आणि हे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद आहे, असं तिने म्हटलं आहे. ताशीने आपल्याला मिळालेल्या पाठिंब्याबद्दल तसंच आर्थिक मदतीबद्दल सर्वांचे आभार मानले आहेत.
या संस्थेत रूजू होण्यापूर्वी ताशीला धाडसी खेळांची फारशी माहिती नव्हती. ताशीला मार्गदर्शकांकडून प्रोत्साहन मिळत गेलं आणि ती गिर्यारोहणाचं मर्म समजू शकली. ताशी अरूणाचल प्रदेशमधल्या अगदी छोटय़ा डोंगराळ भागाची रहिवासी असून तिथल्या लोकांना गिर्यारोहण तसंच धाडसी खेळांची फारशी माहिती नाही. मात्र आता ताशीच्या कामगिरीमुळे तिच्या गावातल्या लोकांनाही प्रेरणा मिळू शकेल. अधिकाधिक महिलांनी गिर्यारोहणाकडे वळावं असं ताशीला वाटतं आणि आपल्या कामगिरीमुळे अनेकींना नक्कीच प्रेरणा मिळेल असं ती सांगते. एव्हरेस्ट सर केल्यानंतरही ताशी शांत बसणार नाही. तिला जगातली इतर शिखरं सर करून विक्रम करायचे आहेत. ताशीच्या जिद्दीला सलाम करायलाच हवा.