प्रतिनिधी / सांगली
विवाहितेच्या छळप्रकरणी संशयित आरोपींना अटक न करण्यासाठी व या गुह्यात त्यांना मदत करण्यासाठी 1 लाख रुपयांची लाच मागणाया व त्यातील 25 हजार रुपये स्वीकारणाया येथील पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस फौजदार राजेंद्र थोरावडे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. गुरूवारी सायंकाळी येथील पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी, येथील साठेनगरमधील तक्रारदाराच्या भावाच्या पत्नीने जाच, हाट व छळप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीत विनोद देवकुळे यांच्यासह त्यांची पत्नी, दोन भाऊ व अन्य काहींना आरोपी करण्यात आले आहे. या गुह्याचा तपास सहाय्यक पोलीस फौजदार थोरावडे याच्याकडे आहे. तपासाच्या नावाखाली थोरावडे हा देवकुळे यांना वारंवार पोलीस ठाण्यात बोलावून घेत होता. ’तुमच्यावर फार गंभीर गुन्हा दाखल आहे. तुम्हा सर्वांना अटक करणार आहे. अटकेनंतर शासकीय सेवेत काम करणाया तुझ्या भावांची नोकरी जाईल’, अशी भीती घालून मानसिक दडपण आणले जात होते. दररोजच्या या मानसिक दबावामुळे देवकुळे यांचे खच्चीकरण झाले होते. परिणामी गेल्या काही दिवसांपासून ते प्रचंड तणावात होते.
’या गुह्यातून वाचायचे असेल व अटक टाळायची असेल तर एक लाख रुपये द्यावे लागतील, अन्यथा कोणालाच सोडणार नाही’, अशी भाषाही थोरावडे वापरत होता. शिवाय दररोज फोन करून पोलीस स्टेशनला बोलावून घेत ’पैसे देताय की कारवाई करू’, अशी दमबाजीही केली जात होती. त्यामुळे देवकुळे यांची मानसिक स्थिती बिघडत चालली होती.
अखेर शनिवारी देवकुळे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रशांत चौगुले यांच्याकडे थोरावडे याच्याबाबत तक्रार केली. तक्रारीची शहानिशा करून शनिवारीच चौगुले यांनी सापळा रचला. शनिवारी सायंकाळी देवकुळे यांना थोरावडे याच्याकडे पाठवण्यात आले. त्यावेळी थोरावडे याने ’मी तुला मदतच करतोय. पण, ते तुला समजत नाही’, असे म्हणून एक लाख रुपये लाचेची मागणी केली. मात्र देवकुळे यांनी एवढय़ा पैशांची जुळणी आता होणार नाही, असे सांगितले. त्यानंतर किमान 30 हजार रुपये आता टोकन म्हणून आता दे. नंतर राहिलेले 70 हजार रुपये दे, अशी मागणी थोरावडे याने केली. हे 30 हजार रुपये सोमवारी देण्याचे ठरले.
सोमवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून देवकुळे यांना 30 हजार ऐवजी 25 हजार रुपये घेऊन थोरावडे याच्याकडे पाठवले. मात्र थोरावडे याने देवकुळे याला सायंकाळी माळी गल्ली भागात नुसतेच फिरवले. मात्र पैसे घेतले नाहीत.
त्यानंतर आज (गुरुवारी) पुन्हा देवकुळे यांना 25 हजार रुपये घेऊन थोरवाडे याच्याकडे पाठवले. आज सायंकाळी पुन्हा थोरावडे याने देवकुळे यांना शहरात अनेक ठिकाणी फिरवले. त्यानंतर रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान थोरावडे याने आपल्या केबिनमध्ये 25 हजार घेतले. त्याला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे तासगावच्या पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रशांत चौगुले यांच्या नेतृत्वाखाली अविनाश सागर, संजय कलकुडगी, भास्कर भोरे यांनी ही कारवाई केली.
तीन आठवडय़ातील दुसरी कारवाई ः
गेल्या तीन आठवडय़ात तासगावातील दोन पोलिसांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. 7 डिसेंबर रोजी पोलीस उपअधीक्षक अशोक बनकर यांच्या गाडीचा चालक विजय घुगरे याला भिलवडी येथे एका ऑनलाईन लॉटरी सेंटरवर कारवाई न करण्यासाठी साडेचार हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडले. तर आज राजेंद्र थोरावडे याला तब्बल 25 हजार रुपयांची लाच घेताना जेरबंद करण्यात आले.