वनक्षेत्रपाल व डाटा ऑपरेटर ताब्यात : तासगावात 24 दिवसात लाचप्रकरणी दुसरी कारवाई
प्रतिनिधी / तासगाव
ट्रकमधून लाकूड वाहतूक करीत असताना कारवाई कामी ताब्यात घेतलेला ट्रक सोडण्यासाठी 30 हजार रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी तासगावातील वन परिक्षेत्र अधिकारी (वनक्षेत्रपाल) व डाटा ऑपरेटर अशा दोघांना सांगलीच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेऊन कारवाई केली आहे. तर याप्रकरणी तासगाव या दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तर 24 दिवसात तासगावात लाचप्रकरणी ही दुसरी कारवाई आहे.
याप्रकरणी लोकसेविका श्रीमती कौशल्या हणमंत भोसले (32) वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय तासगाव, जि. सांगली वर्ग -2, शासकीय निवासस्थान वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय, तासगाव, मुळ रा. मु. पो. चांदणी चौक, रहिमतपूर, ता. कोरेगाव, जि. सातारा व श्रीकांत तुकाराम शिंदे (43) डाटा ऑपरेटर रा. मु. पो. मणेराजुरी, ता. तासगाव यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरूवारी कारवाई केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार त्यांचे मालकीचे ट्रकमधून लाकूड वाहतूक करीत असताना श्रीमती भोसले, वनक्षेत्रपाल यांनी अडवून कामी वन परीक्षेत्र अधिकारी कार्यालय तासगाव याठिकाणी लावला होता. हा ट्रक सोडणे कामी श्रीमती भोसले, वनक्षेत्रपाल व शिंदे डाटा ऑपरेटर यांनी तक्रारदार यांचेकडे 30 हजार रूपये लाचेची मागणी केली असल्याबाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी 24 ऑगस्ट रोजी दिला होता.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 25 ऑगस्ट रोजी व 26 ऑगस्ट रोजी ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता त्यामध्ये तक्रारदार यांचा ट्रक सोडण्याकरिता लोकसेविका श्रीमती भोसले, वनक्षेत्रपाल यांनी तक्रारदार यांच्याकडे 30 हजार रूपये लाचेची मागणी करून ही लाचेची रक्कम डाटा ऑपरेटर शिंदे यांचेकडे देण्यास सांगितलेचे निष्पन्न झाले. त्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय, तासगाव याठिकाणी सापळा लावला असता श्रीकांत शिंदे,डाटा ऑपरेटर रा. मु. पो. मणेराजुरी, ता. तासगाव, जि. सांगली यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करून तक्रारदार यांच्याकडून 30 हजार रूपये स्वीकारलेनंतर त्यांना पकडण्यात आले असून लोकसेविका श्रीमती कौशल्या हणमंत भोसले वन परिक्षेत्र अधिकारी (वनक्षेत्रपाल) वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय, तासगाव, ता. तासगाव, जि. सांगली वर्ग-2 रा. शासकीय निवासस्थान वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय, तासगाव, ता. तासगाव, जि. सांगली मुळ रा. मु. पो. चांदणी चौक, रहिमतपूर ता. कोरेगाव, जि. सातारा यांना वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय तासगाव, ता. तासगाव येथून ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी लोकसेविका श्रीमती कौशल्या हणमंत भोसले (32), वन परिक्षेत्र अधिकारी (वनक्षेत्रपाल) व श्रीकांत तुकाराम शिंदे (43), डाटा ऑपरेटर यांचे विरूध्द तासगाव पोलीस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची रात्री उशीरापर्यंत सुरू होती. ही कारवाई राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त-पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, सुरज गुरव अपर पोलीस उपआयुक्त-अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, सुहास नाडगौडा, अप्पर पोलीस उपायुक्त-अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली सुजय घाटगे, पोलीस उप अधीक्षक, गुरूदत्त मोरे पोलीस निरीक्षक, पोलीस अमंलदार अविनाश सागर, धनंजय खाडे, संजय सकपाळ, सलिम मकानदार, अजित पाटील, राधिका माने, विना जाधव, श्रीपती देशपांडे, चालक बाळासाहेब पवार यांनी केली.
तासगावात 24 दिवसात दुसरी कारवाई : तालुक्यातील तीन
तीन ऑगस्ट रोजी मुरूम वाहतूक प्रकरणी कारवाई केलेला टॅक्टर सोडण्यासाठी कागदपत्रे वरिष्ठ कार्यालयास पाठवण्यासाठी पाच हजार रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी तहसील कार्यालयातील सेवानिवृत्त लिपिक व अन्य एक अशा दोघांवर कारवाई करण्यात आली होती. या कारवईची चर्चा शांत होते न होते तोच बुधवारी 24 व्यादिवशी वनक्षेत्रपाल व डाटा ऑपरेटर यांच्यावर लाचप्रकरणी कारवाई झाली आहे. तर या दोन्ही कारवाईतील चौघांपैकी तिघे तासगाव तालुक्यातील आहेत. त्यामध्ये चिंचणी येथील दोन व मणेराजुरी येथील एक असा समावेश आहे.