पार्किंग समस्या सोडविण्यासाठी हवेत प्रयत्न : सरकारी वाहने कमी; खासगी वाहनांचाच भरणा : गांभीर्याने प्रयत्न करण्याची गरज
प्रतिनिधी /बेळगाव
तालुका पंचायत कार्यालयासमोर मोठय़ा प्रमाणात जागा उपलब्ध आहे. मात्र, येथे सरकारी वाहनांऐवजी खासगी वाहनांचे पार्किंग अनेकांची डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे या ठिकाणी खासगी वाहनचालकांची चांदी आणि अधिकाऱयांची गोची अशी समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ही समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.
ता. पं. कार्यालयासमोर वाहनांची अडचण होऊ लागली आहे. मध्यंतरी ता. पं. अध्यक्षांच्या वाहनांनाच बाहेर पार्किंग करावे लागत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. माजी अध्यक्षांचे वाहन कार्यालयाजवळ जाण्यास अडचण होत असल्याने माजी अध्यक्ष शंकरगौडा पाटील यांनी वाहनांची समस्या सोडविण्यासाठी अधिकाऱयांना सूचना केल्या होत्या. त्यावेळी काही प्रमाणात ही समस्या मार्गी लावण्यात आली होती. त्यानंतर ता. पं. चे माजी कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी गांभीर्याने घेऊन येथील खासगी वाहने पार्किंग करणाऱयांना चांगलेच सुनावले होते.
आदेशाला वाटाण्याच्या अक्षता
आता पुन्हा या ठिकाणी खासगी वाहने पार्क करण्यात येत आहेत. कलादगी यांनी आदेश बजावताच अधिकाऱयांही कामाला जुंपले होते. ता. पं. कार्यालयासमोर होत असलेल्या पार्किंगची समस्या सोडविण्याच्या आदेशाला आता वाटाण्याच्या अक्षता लावण्यात येत आहेत. महत्त्वाचे म्हणजे आरटीओ कार्यालयासमोर उपनोंदणी कार्यालय आहे. या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात गर्दी होत असते. मात्र, जे कामासाठी येतात ते ता. पं. कार्यालयासमोर आपले वाहन पार्क करण्यात धन्यता मानत आहेत. त्यामुळे ता. पं. कार्यालयात येणाऱयांना मोठा त्रास सहन करावा लागत
आहे.
तालुका पंचायतची इमारत म्हैसूर राज्य असल्यापासून आहे. ही इमारत उभारण्यासाठी 1966 साली पायाखोदाई करण्यात आली होती. हे काम 1968 साली पूर्ण झाले. मागील वेळी असलेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षांनी सर्वच सदस्यांना विश्वासात घेऊन तालुका पंचायत कार्यालयाचा विकास साधण्यावर भर दिला होता.
आता पार्किंग समस्या भेडसावतेय
यामध्ये तालुका पंचायतीला मंजूर झालेल्या निधीतून सर्व सदस्यांनी विकास साधण्यावर भर दिला होता. त्याप्रमाणे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कक्षांच्या रंगरंगोटीचे काम करण्यात आले होते. या सर्व खर्चासाठी 3 लाख 50 हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार होता. याचबरोबर तालुका पंचायतसमोर पेव्हर्स घालून येथे सरकारी वाहनांना पार्किंग करण्याची मुभा देण्यात आली होती. आता मात्र या ठिकाणी पार्किंग समस्या भेडसावणारी ठरत आहे.
लवकरच कर्मचाऱयांची बैठक घेऊ
आपण येथे खासगी वाहन पार्किंगला बंदी घालण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी वेगळा उपक्रम राबविणार आहे. लवकरच कार्यालयातील कर्मचाऱयांची बैठक घेऊन याबाबत काय करता येईल, यासंबंधी विचार करणार आहे, असे ता. पं. कार्यकारी अधिकारी राजेश दनवाडकर यांनी सांगितले.