प्रतिनिधी/ बेळगाव
तिगडी (ता. बैलहोंगल) ग्रामपंचायत अध्यक्षाचा भीषण खून करण्यात आला आहे. शुक्रवारी ही घटना घडली असून यासंबंधी बैलहोंगल पोलीस स्थानकात त्याच गावातील चौघा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांच्या शोधासाठी पोलीस पथक नियुक्त करण्यात आल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी सांगितले.
मुन्ना उर्फ मुक्तुमहुसेनी इकबाल बहाद्दुरसी (वय 35, रा. तिगडी) असे त्याचे नाव असून तो तिगडी ग्रामपंचायतीचा अध्यक्ष होता. त्याच गावातील अर्जुनाप्पा बसवाणेप्पा निलगुंद, अद्रुषाप्पा अर्जुनाप्पा निलगुंद, महांतेश अर्जुनाप्पा निलगुंद, निंगव्वा अर्जुनाप्पा निलगुंद (सर्व रा. तिगडी) या चौघा जणांविरूद्ध भा.दं.वि. 302 कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
शेतजमिनीत उगवलेले गवत कापण्यावरुन झालेल्या वादावादीनंतर विळय़ाने हल्ला करुन त्याचा भीषण खून करण्यात आला. घटनेची माहिती समजताच बैलहोंगलचे एएसपी प्रदीप, मंडल पोलीस निरीक्षक मंजुनाथ कुसगल आदींनी घटनास्थळाची पाहणी केली.
यासंबंधी रात्री जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी माहिती दिली असून खुनानंतर फरारी झालेल्या संशयित आरोपींना अटक करण्यासाठी बैलहोंगलच्या मंडल पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली पथक स्थापन करण्यात आले आहे. लवकरच त्यांना अटक करण्यात येणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. संशयित आरोपी एकाच कुटुंबातील आहेत.