तिरुवनंतपुरम / ऑंनलाईन टीम
केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथे तिरंगा फडकवण्यावरुन एका भाजप नेत्यावर रविवारी, दि. १५ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाचे केरळ युनिटचे प्रमुख के सुरेंद्रन यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पक्ष कार्यालयात ध्वजारोहण सोहळ्यादरम्यान तिरंगा उलटा फडकवल्याप्रकरणी तिरुवनंतपुरम पोलिसांनी सुरेंद्रन यांच्यांवर गुन्हा दाखल केला.
याविषयी के सुरेंद्रन म्हणाले की, माझ्यावर राजकीय हेतूने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच राष्ट्रध्वज फडकावताना अर्ध्यावरच आम्हाला ती चूक लक्षात आली व त्याचवेळी ची चूक दुरुस्थ केली. पण काही राजकीय व्यक्तींनी याबद्दलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. यामुळे ही कारवाई आपल्यावर करण्यात आल्याचे के सुरेंद्रन यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ही तिरंग्यावरून झाली होती टीका
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी फेसबूक लाईव्ह करत जनतेशी संवाद साधला होता. यावेळी अॅड. असिम सरोदे यांनी फेसबुक लाईव्हचा स्क्रीनशॉट शेअर करत मुख्यमंत्री ठाकरे यांनी राष्ट्रीय ध्वज संहितेचे उल्लंघन केले असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. तसेच तिरंगा झेंड्याच्या वरच्या पातळीवर अथवा बरोबरीने इतर कोणताही ध्वज असू नये हा साधा नियम पाळावा अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना करत नाराजी व्यक्त केली होती.