भाविकांसाठी गुरूवारपासून दर्शन सुरू
वृत्तसंस्था/ तिरूपती
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेली 80 दिवस बंद असलेले तिरूपती बालाजी मंदिर सोमवारपासून खुले होणार आहे. 8 ते 10 जून या कालावधीमध्ये मंदिर कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना दर्शनाची परवानगी असेल. मंदिरामध्ये सुमारे 21 हजार कर्मचारी आहेत. 11 जूनपासून सकाळी साडेसहा ते सायंकाळी साडेसात या काळात भाविकांना दर्शन घेता येईल. मात्र यासाठी ऑनलाईन तिकिट बुकिंग करावे लागेल. एका दिवशी सहा हजार व एक तासात केवळ 500 भाविकांनाच दर्शनाची परवानगी देण्यात येईल, अशी माहिती तिरूमाला तिरूपती देवस्थान ट्रस्ट्रने शनिवारी दिली. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार 65 वर्षांवरील व 10 वर्षांच्या आतील वयोगटातील भाविकांना प्रवेश मिळणार नसल्याचेही ट्रस्टने स्पष्ट केले आहे.
भाविकांना दर्शनासाठी 11 जूनपासून मंदिर खुले होईल. केवळ तिरूपती दर्शनाची परवानगी असेल. मंदिर परिसरातील अन्य मंदिर आणि स्वामी पुष्करिणी येथे जाण्यास बंदी कायम ठेवण्यात आली आहे. मंदिर परिसरात कोरोना कक्षाची स्थापना केली आहे. यामध्ये 200 कर्मचारी आणि भाविकांच्या चाचणीची सुविधा करण्यात आली आहे. दररोज सहा हजार भाविकांना दर्शनाची परवानगी मिळेल. यातील तीन हजार भाविकांना व्हीआयपी तिकीटावर (प्रती व्यक्ती 300 रूपये) दर्शनाचा लाभ घेऊ शकतील. दर्शनासाठीची ऑनलाईन बुकिंग 8 जूनला सकाळी सुरू होईल, असे ट्रस्टच्या सूत्रांनी सांगितले. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तिरूपती बालाजी मंदिर हे 20 मार्चपासून बंद आहे. यापूर्वी प्रतिदिन 80 हजार भाविक दर्शनासाठी येत असत. कोरोनामुळे मंदिर दान स्वरूपात येणारी सुमारे 500 कोटींचे रूपयांचेही नुकसान झाले आहे.