सुवर्णपदकाची ठरली मानकरी
प्रतिनिधी / सावंतवाडी:
सावंतवाडी तालुक्यातील तिरोडा गावची कन्या दीपाली वासुदेव मेस्त्राr हिने एमएस्सी (इंजिनिअरींग मेथॅमॅटिक्स) अभ्यासक्रमात मुंबई विद्यापीठात प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. सर्व शाखांमधून प्रथम आल्याने तिला सुवर्णपदक मिळाले. घरच्या गरिबीवर मात करत दीपाली हिने मिळविलेल्या या यशाने सिंधुदुर्ग जिल्हय़ाची मान उंचावली आहे. 2 सप्टेंबरला झालेल्या ऑनलाईन पदवीदान समारंभात तिचा गौरव करण्यात आला. आता सरकारच्या फर्स्ट स्टेप ऑफ इन्स्पायर फेलोशिपसाठी तिची निवड झाली आहे. त्यामुळे ती आता पीचएचडी करणार आहे.
दीपाली हिचे प्राथमिक शिक्षण तिरोडा शाळा नं. 1 मध्ये झाले. तर आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण शिरोडा अ. वि. बावडेकर विद्यालयात झाले. त्यानंतर बारावीपर्यंतचे शिक्षण तिने शिरोडा येथीलच अ. वि. बावडेकर कनिष्ठ महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर नवी मुंबईत येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमधून बीएस्सी (मेथॅमॅटिक्स) पदवी मिळविली. तर मुंबई येथील इन्स्टिटय़ुट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमधून 2017-19 मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. एमएस्सीच्या सर्व शाखांमधून प्रथम आल्याने तिला सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. या यशाबद्दल शैक्षणिक वर्तुळातून तिचे अभिनंदन होत आहे. तिरोडा गावच्या कन्येने विद्यापीठात सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला, ही गौरवाची बाब आहे. तिने जिल्हय़ाचे नाव उज्ज्वल केल्याचे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी म्हटले आहे.