कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटमुळे घेतला निर्णय
वृत्तसंस्था / जेरूसलेम
कोरोना विषाणूवरील लसीचा तिसरा डोस देणारा देणारा इस्रायल पहिला देश ठरला आहे. फायजर-बायोएनटेक लसीचा तिसरा डोस प्रौढांना देण्यास सुरुवात झाली आहे. देशात कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण वाढू लागल्यावर सरकारने लसीचा तिसरा डोस प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे.
कमकुवत रोगप्रतिकारक क्षमता असलेल्या लोकांना तिसरा डोस दिला जाऊ शकतो, याचबरोबर हृदय, फुफ्फुस, कर्करोग आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण (किडनी ट्रान्सप्लांट) करविणाऱया लोकांना तिसरा डोस दिला जाऊ शकतो असे इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
सद्यस्थितीत तिसरा डोस देण्याचा निर्णय योग्य आहे. आम्ही सातत्याने तिसऱया डोसच्या उपयुक्ततेवर संशोधन करत होतो असे इस्रायलमधील शेबा मेडिकल सेंटरचे तज्ञ प्राध्यापक गालिया यांनी सांगितले आहे. एक महिन्यापूर्वी डेल्टा व्हेरियंटचे प्रतिदिन 10 कमीपेक्षा कमी रुग्ण सापडत होते, आता हा आकडा 452 झाला आहे. आरोग्य मंत्रालयानुसार देशातील रुग्णालयांमध्ये सध्या 81 रुग्ण दाखल आहेत. यातील 58 टक्के जणांनी कोरोनावरील लस घेतली हाती.
57.4 टक्के लोकसंख्येचे लसीकरण
डेल्टा व्हेरियंटच्या विरोधात कोरोनावरील लसी प्रभावी असल्याचे अध्ययनातून समोर आले आहे. इस्रायलमध्ये लसीकरण मोहिमेचा वेग मोठा राहिला आहे. तेथील 57.4 टक्के लोकसंख्येचे पूर्ण लसीकरण करण्यात आले आहे. या तिसऱया डोसमुळे कोरोनाच्या बीटा व्हेरियंटच्या विरोधात उत्तम सुरक्षेची अपेक्षा केली जात आहे. बीटा व्हेरियंट सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळून आला होता. हा व्हेरियंट आतापर्यंतचा सर्वात घातक कोरोना विषाणू आहे.