वृत्तसंस्था/ ब्रिस्टॉल
यजमान इंग्लंड आणि लंका यांच्यातील रविवारी तिसरा आणि शेवटचा वनडे सामना पावसामुळे वाया गेल्यानंतर इंग्लंडने तीन सामन्यांची ही मालिका 2-0 अशी एकतर्फी जिंकली. तिसऱया आणि शेवटच्या सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज टॉम करनने चमकदार कामगिरी करताना चार बळी घेतले.
या शेवटच्या सामन्यात इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर लंकेचा डाव 166 धावात आटोपला. सॅम करनचा मोठा भाऊ टॉमने या सामन्यात 35 धावांत 4 गडी बाद केले. लंकेची एकवेळ स्थिती 4 बाद 50 अशी केविलवाणी झाली होती. लंकेच्या शनाका आणि करुणारत्ने या जोडीने सातव्या गडय़ासाठी 29 धावांची भागिदारी केली. हसरंगाने 20 धावा जमविल्या. शनाकाने नाबाद 48 धावा केल्या. लंकेच्या डाव 42 षटकात आटोपला. त्यानंतर पावसाला प्रारंभ झाल्याने इंग्लंडला खेळता आले नाही. पंचांनी हा सामना रद्द केल्याचे नंतर जाहीर केले.