आरोग्य तज्ञांचा इशारा – ऑगस्टमध्येच चंचूप्रवेश होणार असल्याचा काही संशोधकांचा दावा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतातील कोरोनाच्या तिसऱया लाटेसंदर्भात आरोग्य तज्ञांनी शुक्रवारी महत्त्वाचा इशारा दिला. आरोग्य तज्ञांच्या पथकाने ऑक्टोबरपर्यंत देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच तिसरी लाट ही दुसऱया कोरोना लाटेपेक्षा अधिक नियंत्रित असली तरी देशात कोरोना संसर्ग आणखी एक वर्ष राहू शकेल, असा दावाही केला जात आहे. दरम्यान, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनीही तिसरी लाट लसीकरण मोहीम तीव्र केल्यानंतर नियंत्रित होईल, असे म्हटले आहे.
भारतात लस लाभार्थींची संख्या वाढल्यामुळे तिसऱया लाटेचा प्रादुर्भाव थोडा कमी होईल, असे आरोग्य तज्ञ, डॉक्टर, शास्त्रज्ञ, विषाणूशास्त्रज्ञ, साथीचे रोगशास्त्रज्ञ आणि प्राध्यापकांच्या एसएनएपी सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. मात्र, ऑगस्टपासूनच देशात तिसऱया लाटेचा चंचूप्रवेश सुरू होऊन ऑक्टोबरपर्यंत तेजीत असेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ही लाट देशात पुढील फेबुवारीपर्यंतही अधिक तीव्रपणे पसरणार असली तरी वेगाने होणाऱया लसीकरणामुळे संसर्गाला आळा बसणार असल्याचे मत तज्ञांनी नोंदवले आहे. कोरोना विषाणू पुढील एक वर्षासाठी भारतात धोकादायक राहील, असे मतही काही संशोधकांनी नोंदवले आहे.
‘क्रॅश कोर्स’ योजनेद्वारे आरोग्य यंत्रणेला बळकटी
एक लाख युवकांना प्रशिक्षित करणार- पंतप्रधानांची घोषणा
देशाची वाढती लोकसंख्या पाहता आरोग्य क्षेत्राचा विस्तार करणे आवश्यक आहे. त्यामुळे देशातील कोरोना योद्धय़ांसाठी क्रॅश कोर्सची निर्मिती करण्यात आली असून त्या माध्यमातून एक लाख युवकांना प्रशिक्षित करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी केली. केंद्र सरकारने सुरू केलेला हा क्रॅश कोर्स 26 राज्यांमधील 111 केंद्राच्या माध्यमातून अंमलात आणण्यात येणार आहे. पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कोविड 19 योद्धय़ांसाठीच्या या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन केले. युवकांच्या प्रशिक्षणामुळे तिसऱया लाटेशी सामना करताना आरोग्य यंत्रणेला अधिक बळ मिळणार आहे.
आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी देशातील अनेक राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी या क्रॅश कोर्सची मागणी केली होती. त्यामुळे देशातील सर्वोत्तम तज्ञांच्या सहाय्याने केंद्र सरकारने हा क्रॅश कोर्स तयार केला आहे. त्या माध्यमातून दोन ते तीन महिन्यात एक लाख युवकांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे, असे मोदी म्हणाले. या क्रॅश कोर्समध्ये आरोग्यविषयक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे आरोग्य क्षेत्राला एक नवीन ऊर्जा मिळणार असून युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.