खासगी डॉक्टरांचे म्हणणे; लहान मुलांना अधिक धोका, प्रशासनासह खासगी रुग्णालयेही झाली आहेत सज्ज
प्रतिनिधी/सोलापूर
कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याच्या आधीपासूनच तिसऱया लाटेची चर्चा आहे. प्रशासकीय पातळीवर अधिकाऱयांच्या बैठका घेऊन सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर खासगी वैद्यकीय क्षेत्रातही तयारी सुरू आहे. कोरोनाची तिसरी लाट डेल्टा प्लस व्हेरिएंटसह येणार आणि ती लहान मुलांना अधिक धोकादायक असणार असे सोलापुरातील खासगी डॉक्टरांचे म्हणणे आहे.
डॉक्टरांच्या मते तिसऱया लाटेत कोरोनाची तीव्रता अधिक असणार आहे, पण प्रशासकीय आणि खासगी वैद्यकीय क्षेत्राने केलेल्या तयारीमुळे मृत्यूदर कमी असेल. आता लोक दुर्लक्ष करणार नाहीत, वेळेत उपचार घेतील. दुसऱया लाटेत ऑक्सिजन अभावी रुग्ण आणि रुग्णालय प्रशासनाची खूपच धावपळ झाली. तिसऱया लाटेत ऑक्सिजनसाठी धावपळ होऊ नये म्हणून प्रशासकीय पातळीवर आतापासूनच खबरदारी घेतली जात आहे. अनेक खासगी रुग्णालयांनी स्वत:चे ऑक्सिजन प्लान्ट उभारण्यास सुरुवात केली आहे.
तिसरी लाट वैद्यकीय क्षेत्रातील लोक ठरवून आणताहेत अशी चर्चा आहे. हे खरे आहे का? या प्रश्नावर सोलापुरातील डॉ. नितीन तोष्णीवाल म्हणाले, `लाट कोणी आणू शकत नाही. कोरोना कोणाच्या हातात नाही. लसीकरणानंतरही अनेकांना कोरोना होत आहे. दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. या लाटेत अनेक घरे उद्ध्वस्त झाली. वेळेत उपचार न घेतल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला.
महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय यासह सर्व शासकीय यंत्रणा डॉक्टरांच्या संघटनांसोबत संपर्कात आहेत. तिसऱया लाटेत सुरक्षित राहण्यासाठी मास्क, सॅनिटायझर, गर्दीत न जाणे हे नियम सर्वांनी पाळावेत, असे आवाहनही डॉ. नितीन तोष्णीवाल यांनी केले आहे.
ही आहेत `डेल्टा प्लस‘ची लक्षणे
डेल्टा प्लस या विषाणूने नाक, घशाद्वारे फुफ्फुसात प्रवेश केल्यानंतर तीव्र प्रमाणात सर्दी होते. खोकला, डोकेदुखी, घसा खवखवणे, अंगदुखी, डोकेदुखी ही लक्षणे आढळून येतात.
डेल्टा प्लसचा धोका टळलेला नाही, काळजी घ्या
कोरोना संसर्गाने सर्वत्र हाहाकार माजविला असतानाच डेल्टा प्लस हा कोरोनाचा नवा विषाणू सध्या धोकादायक ठरत आहे. रत्नागिरी जिह्यात या विषाणूचे रुग्ण आढळले असले तरी महाराष्ट्रात इतर ठिकाणीदेखील हे विषाणू पसरू शकतात. ही परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने अंशतः लॉकडाऊन केले असून नागरिकांनी शासनाचे सर्व नियम पाळावेत व आपल्या शरीरात हा नवीन विषाणू शिरू नये याची काळजी घ्यावी.
अधिक तीव्रतेसह तिसरी लाट येणार
कोरोनाची तिसरी लाट ऑगस्टमध्ये येणार. व्हायरसची तीव्रता अधिक असेल. पहिल्या लाटेत वृद्धांना जास्त धोका दिसून आला. दुसऱया लाटेत मध्यम वयोगटातील रुग्ण अधिक होते. आता तिसऱया लाटेत लहान मुलांना अधिक धोकादायक असेल. – डॉ. नितीन तोष्णीवाल, सोलापूर
दोन्ही डोस तातडीने घ्यावेत
डेल्टा प्लस हा विषाणू पसरू नये यासाठी नागरिकांनी अजूनही घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक काम असल्यास दोन मास्कचा वापर करावा. वेळोवेळी साबण किंवा हॅन्डवॉशने हात धुवावा. सॅनिटायझरचा वारंवार वापर करावा. घराबाहेर पडल्यानंतर गर्दीत सहा फूट अंतर ठेवावे. कोविड प्रतिबंधाचे दोन्ही डोस तातडीने घ्यावेत. प्रोटिनयुक्त सकस आहार घ्यावा. फळांचे सेवन करावे. लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. – डॉ. पोपट काळे, वैराग, ता. बार्शी
अत्यावश्यक कामांसाठीच बाहेर पडावे
अद्याप कोरोनाची परिस्थिती बदललेली नाही. दुपारी चारपर्यंत अत्यावशक तसेच इतर दुकाने खुली ठेवण्याची परवानगी आहे. पाचनंतर संचारबंदीचा आदेश लागू आहे. नागरिकांनी पार्सल आणण्यासाठी म्हणून बाहेर पडू नये.
– प्रवीण पाटील, पोलीस निरीक्षक, फौजदार चावडी पोलीस ठाणे, सोलापूर