प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील रेल्वे फाटकावर होणारी वाहतूक कोंडीची समस्या निवारण्यासाठी तिसरे रेल्वे फाटकावर उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. डिसेंबरपूर्वी काम पूर्ण करून रस्ता खुला करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू असून रस्त्याच्या एका बाजूला खांब उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ट्रॉझल बिम घालण्यात येत आहे.
शहराअंतर्गत रस्त्यावर 12 ठिकाणी रेल्वे फाटक असून यापैकी 7 रेल्वे फाटक हटवून नवीन उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय रेल्वे खात्याने घेतला आहे. याकरिता केंद्रीय अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी पहिला रेल्वे उड्डाणपूल कपिलेश्वर रोड येथे उभारण्यात आला असून दुसरा उड्डाणपूल जुना धारवाड रोड येथे उभारण्यात येत आहे. तसेच याअंतर्गत ब्रिटिशकालीन ओव्हरब्रिज हटवून गोगटे चौक परिसरात नवीन उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. आता तिसऱया रेल्वे फाटकावर उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. रस्त्यावर होणारी वाहनांची वर्दळ आणि येथील अडचणीचा विचार करून डिसेंबरपूर्वी तिसरे रेल्वे गेट उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवून उभारणीचे काम युद्धपातळीवर करण्यात येत होते. पण कोरोनामुळे काम बंद ठेवल्याने सहा महिन्यांपासून काम रखडले आहे. सध्या कुशल कामगार नसल्याने उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू आहे. सध्या उपलब्ध असलेल्या कामगारांकरवी काम सुरू आहे. हा पूल 14 खांबावर उभारण्यात येणार असून रस्त्याच्या एका बाजूचे खांब उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जलवाहिन्या आणि डेनेज वाहिन्या असलेल्या ठिकाणाचे खांब उभारण्याचे काम रखडले होते. मात्र जलवाहिन्या आणि ड्रेनेज वाहिन्या स्थलांतराचे काम पूर्ण करून खांब उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. याठिकाणी खांबाचा पाया खोदाईकरिता रोटर यंत्रणेचा वापर करण्यात आल्याने खांब उभारण्याचे काम तातडीने झाले. खांब उभारण्याकरिता पाया निर्माण करण्यासाठी प्रत्येकी आठ खड्डे खोदण्यात आले होते. प्रत्येक खड्डा 70 ते 80 फूट खोल आणि 3 फूट व्यासाचा एक खड्डा खोदण्यात आला आहे. रोटर मशीनमुळे खोदाईचे काम लवकर होणे शक्मय झाले.
डिसेंबरपर्यंत एका बाजूचे काम पूर्ण होण्याची शक्यता
यानंतर प्रत्येक खांबावर ट्रॉझल बिम घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ट्रॉझल बिम घालण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर गर्डर ठेवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. गर्डर तयार करण्याचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. अनगोळ नाका ते तिसरे रेल्वे गेट पर्यंतच्या रस्त्यावर गर्डर तयार करून ठेवण्यात आले आहे. गर्डर बसवून काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. पण कामाची गती पाहता डिसेंबरपर्यंत केवळ एका बाजूच्या रस्त्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.