रेल्वेमार्ग दुपदरीकरणाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण : वाहनधारकांना गेटबंदमुळे मोठा फटका
प्रतिनिधी /बेळगाव
मिरज ते लोंढा दरम्यानच्या रेल्वेमार्ग दुपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. टिळकवाडी येथील तिसरे रेल्वेगेट येथे दुसरा नवीन ट्रक घालण्याचे काम करण्यात आल्याने तीन दिवस रेल्वेगेट बंद ठेवण्यात आले होते. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वेगेट मंगळवारी सकाळपासून खुले करण्यात आले. यामुळे वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.
रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणासोबतच विद्युतीकरण केले जात आहे. जुना ट्रक बाजूला सरकवून नवा ट्रक घालण्यात येत आहे. इतर भागातील काम गतीने होत असले तरी शहरातील कामाला काहीसा विलंब होत आहे. शहरातील वाहनांची संख्या मोठी असल्यामुळे रेल्वेगेट बंद ठेवून काम पूर्ण करावे लागत आहे.
शनिवारी सकाळपासून रेल्वेगेट बंद ठेवले होते. तिसऱया रेल्वेगेटवरील वाहतूक दुसऱया व पहिल्या रेल्वेगेटमार्गे वळविण्यात आली होती. यामुळे काँग्रेस रोड परिसरात मोठी वाहतूक कोंडी होत होती. उद्यमबाग येथे कामाला जाणाऱया कामगारांना गेटबंदमुळे मोठा फटका बसला. मंगळवारी सकाळी रेल्वेगेट खुले करण्यात आल्याने तीन दिवसांपासून होत असलेली वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी झाली.