लेयॉनचे 5 बळी, फिलिप्सचे अर्धशतक, ऑस्ट्रेलियाला 243 धावांची आघाडी
वृत्तसंस्था/ सिडनी
येथे सुरू असलेल्या तिसऱया आणि शेवटच्या क्रिकेट कसोटीवर यजमान ऑस्ट्रेलियाने आपली पकड रविवारी खेळाच्या तिसऱया दिवसांअखेर अधिक भक्कम करताना न्यूझीलंडवर 243 धावांची आघाडी मिळविली आहे. ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज लेयॉनने 68 धावांत 5 गडी बाद केले तर कसोटीत पदार्पण करणाऱया न्यूझीलंडच्या ग्लेन फिलीप्सने अर्धशतक (52) झळकविले.
तीन सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली आहे. या शेवटच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 454 धावा जमविल्यानंतर न्यूझीलंडने बिनबाद 63 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरूवात केली. लेयॉनच्या फिरकीसमोर न्यूझीलंडचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. न्यूझीलंडतर्फे कसोटीत पदार्पण करणाऱया फिलीप्सने एकांकी लढत देत 115 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 52 जमविल्या. कर्णधार लेथमने 4 चौकारांसह 49, ब्लंडेलने 4 चौकारांसह 34, रॅव्हेलने 4 चौकारांसह 31, टेलरने 4 चौकारांसह 22, ग्रॅण्डहोमने 3 चौकारांसह 20 तर ऍसलने 4 चौकारांसह नाबाद 25 धावा जमविल्या. दोन जीवदानाचा लाभ घेत फिलिप्सने अर्धशतक नोंदविले. नयूझीलंडचा पहिला डाव 95.4 षटकांत 251 धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियातर्फे लेयॉनने 5 तर कमिन्सने 44 धावांत 3 आणि स्टार्कने 1 गडी बाद केला. खेळाच्या पहिल्या सत्रात लेयॉनने न्यूझीलंडच्या ब्लंडेल आणि रॅव्हेल यांना बाद केले. खेळाच्या दुसऱया सत्रात न्यूझीलंडने 3 फलंदाज गमविले. उपाहारानंतर दुसऱया षटकांत कमिन्सने अनुभवी टेलरला पायचीत केले. न्यूझीलंडतर्फे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा जमविणारा टेलर दुसरा गोलंदाज आहे. माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंगने कसोटीत सर्वाधिक म्हणजे 7172 धावा जमविल्या असून टेलरने 7152 धावा जमविल्या आहेत. टेलर बाद झाल्यानंतर स्टार्कने वेटलिंगचा त्रिफळा उडविला. चोरटी धाव घेण्याच्या नादात ग्रॅण्डहोम धावचीत झाला. ऑस्ट्रेलियाच्या लेयॉनने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 385 बळी नोंदविले आहेत. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर पहिल्या डावात 203 धावांची आघाडी मिळविली.
ऑस्ट्रेलियाने दुसऱया डावात दिवस अखेर 16 षटकांत बिनबाद 40 धावा जमविल्या. वॉर्नर 1 चौकारांसह 23 तर बर्न्स 16 धावांवर खेळत आहे. या कसोटीतील खेळाचे दोन दिवस बाकी असून ऑस्ट्रेलियाचा संघ विजयाकडे वाटचाल करीत आहे.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया प. डाव- सर्वबाद 454, न्यूझीलंड प. डाव 95.4 षटकांत सर्वबाद 251 (फिलिप्स 52, लेथम 49, ब्लंडेल 34, रॅव्हेल 31, टेलर 22, ग्रॅण्डहोम 20, ऍसल नाबाद 25, लेयॉन 5-68, कमिन्स 3-44, स्टार्क 1-57), ऑस्ट्रेलिया दु. डाव 16 षटकांत बिनबाद 40 (वॉर्नर खेळत आहे 23, बर्न्स खेळत आहे. 16 ).