वृत्तसंस्था /लंडन
यजमान इंग्लंडने भारताविरुद्ध होणाऱया तिसऱया कसोटी सामन्यासाठी खराब फॉर्ममधील सलामीवीर डॉम सिबलीला वगळले असून त्याच्याऐवजी डेव्हिड मलानला संघात पाचारण केले. याशिवाय, सीमर सकिब महमूदचा देखील त्यांनी संघात समावेश केला. जलद गोलंदाज मार्क वूड दुखापतग्रस्त असला तरी 15 सदस्यीय संघातील त्याचे स्थान अबाधित ठेवले गेले आहे. वूड तंदुरुस्त होऊ शकला तर त्याला खेळवण्याचा व्यवस्थापनाचा विचार आहे. उभय संघातील तिसरी कसोटी दि. 25 पासून खेळवली जाणार आहे.
5 कसोटी सामन्यांच्या या मालिकेत भारतीय संघ सध्या 1-0 फरकाने आघाडीवर आहे. विराटसेनेने लॉर्ड्सवरील कसोटीत 151 धावांनी दणकेबाज विजय संपादन करत ही आघाडी प्राप्त केली.
तिसऱया कसोटी सामन्याच्या निमित्ताने डेव्हिड मलान 3 वर्षांच्या कालावधीनंतर राष्ट्रीय संघात परतेल. यापूर्वी, ऑगस्ट 2018 मध्ये इंग्लंडने एजबॅस्टन कसोटीत भारताला नमवले, त्या संघात मलानने आपले शेवटचे कसोटी प्रतिनिधीत्व केले.
‘सर्व क्रिकेट प्रकारात डेव्हिड मलानचा अनुभव लक्षवेधी आहे. संधी मिळाल्यास तो उत्तम योगदान देण्याची क्षमता राखून आहे’, असे इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवूड याप्रसंगी म्हणाले. जूनमध्ये हेंडिग्ले येथे ससेक्सविरुद्ध यॉर्कशायरतर्फे खेळताना त्याने 199 धावांची दमदार खेळी साकारली होती, याचा त्यांनी उल्लेख केला. मार्क वूडच्या प्रगतीवर वैद्यकीय पथक देखरेख करत आहे.
इंग्लिश संघ : जो रुट (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, जोनाथन बेअरस्टो, रोरी बर्न्स, जोस बटलर, सॅम करण, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, सकिब महमूद, डेव्हिड मलान, क्रेग ओव्हर्टन, ऑलि पोप, ऑलि रॉबिन्सन, मार्क वूड.