सिडनीलाच प्राधान्य देणार असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे स्पष्टीकरण
वृत्तसंस्था/ ऍडलेड
सिडनीमध्ये कोरोनाबाधित रुग्ण्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱया तिसऱया व चौथ्या कसोटीच्या ठिकाणात अदलाबदल करण्याचा विचार क्रिकेट ऑस्ट्रेलियाने चालविला असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले असले तरी सिडनीलाच आमचे प्रथम प्राधान्य असेल, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने रविवारी स्पष्ट केले.
सिडनीमध्ये 7 जानेवारीपासून तिसरी तर ब्रिस्बेनमध्ये चौथी कसोटी खेळविली जाणार आहे. सिडनीच्या उत्तरेकडील बीचेसवर कोरोना व्हायरस मोठय़ा प्रमाणात वाढल्याचे समजल्यानंतर गेल्या आठवडय़ात ऑस्ट्रेलियन क्रिकेटचे पदाधिकारी सावध झाले होते. त्यामुळे तिसरी व चौथी कसोटी यांच्या ठिकाणात बदल करणे हा उत्तम पर्याय असल्याने सीएने ब्रिस्बेनमध्ये तिसरी व सिडनीमध्ये चौथी कसोटी ठेवण्याचा विचार चालविला असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र सीएचे अंतरीम प्रमुख कार्यकारी अधिकारी निक हॉकली यांनी, तिसऱया कसोटीचे आयोजन सिडनीतच करण्याबाबत आम्ही आशावादी आहोत, असे स्पष्ट केले आहे. ‘वेळापत्रकात आम्ही कोणताही बदल केलेला नाही आणि सिडनी क्रिकेट मैदानातच सामना खेळविण्याला आमचे प्राधान्य आहे,’ असे त्यांनी म्हटल्याचे सिडनी मॉर्निंग हेराल्डने वृत्त दिले आहे.
‘आमच्यासाठी हा मोसम अतिशय आव्हानात्मक ठरला असून जैवसुरक्षितता पथक, सरकार, राज्य आणि प्रादेशिक संघटना, ऑस्ट्रेलिया क्रिकेटपटू संघटना, आमचे भागीदार आणि मैदानाचे पदाधिकारी यांच्याशी सखोल चर्चा केल्यानंतरच परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी म्हटले आहे. सिडनीत कोरोनाचा फैलाव वेगात होत असल्याने डेव्हिड वॉर्नर व गोलंदाज सीन ऍबॉट या जखमी खेळाडूंना तातडीने सिडनीहून मेलबर्नला हलविण्यात आले आहे. याच ठिकाणी दुसरी कसोटी होणार आहे.